अमिबा, प्रतिसाद फारच आवडला.
भाषा काळाप्रमाणे वळण घेते. १४ ते १८ व्या शतकात मराठीत फारसी, तुर्की आणि अरबी भाषेतून अनेक शब्द आले. शुद्धीकरणाच्या नावाखाली हे सर्व शब्द मराठीतून काढून टाकायचे का?
अमिबा अगदी मनातले बोलले. एक शुद्ध लेखनाचा आणि भाषणाचा आग्रह करणाऱ्या मराठी पांढरपेशांनी, त्यातही परदेशस्थ मराठी पांढरपेशांनी कितीही कंठशोष केला तरी काही फारसा फरक पडणार नाही, असेही वाटते. जी भाषा कोणी बोलत नाही त्या भाषेचा आग्रह धरण्यात, तिला वापरण्यात काही अर्थ नाही. जिवंत भाषेपासून दूर गेलो की "विदागार", "विरोपपत्र" ह्या शब्दांसारखे रुळायला अतिशय कठीण, बोजड शब्द आपण घडवतो.
स्वा. सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीने मराठीला काही चांगले नवीन शब्द नक्कीच दिले. पण ह्या चळवळीने मराठीचे नुकसानही केले, असा देखील एक मतप्रवाह मराठी भाषेच्या विद्वानांत आहे. प्रा. श्री. के. क्षीरसागर आदींनी तर टीकाच केली आहे. "भाषाशुद्धीच्या चळवळीने मराठी भाषेचे केलेले नुकसान" असा स्वतंत्र विषय चर्चेला घेता येईल.
तसेच 'धेडहिंग्लिश' भाषेला विरोध करणाऱ्यांपैकी काही अशा विरोधातून आपली मक्तेदारी कायम ठेवू पाहत आहेत की काय, अशी शंकाही येते. "आम्ही बोलतो तीच भाषा 'प्रमाण' आणि 'शुद्ध'!" असे समजणारे साफ आपले 'कुलिनत्व' जपण्यासाठी असे करत आहेत की काय? आपण शुद्धाशुद्धतेच्या भंपक कल्पनांना मूठमाती द्यायला हवी. असो. शरदराव, आपली पोटतिडीक समजली. 'पडलो तरी नाक वर' ह्या म्हणीचे दिलेले उदाहरण आवडले. पण बहुसंख्य मराठी माणसे त्यांच्या सोयीनुसार भाषा वळवणार, राबवणारच.