प्रतिसाद आवडला व पटलाही.
परंतु काही शंका आहेत-

भाषा काळाप्रमाणे वळण घेते. १४ ते १८ व्या शतकात मराठीत फारसी, तुर्की आणि अरबी भाषेतून अनेक शब्द आले. शुद्धीकरणाच्या नावाखाली हे सर्व शब्द मराठीतून काढून टाकायचे का?

हे शब्द मराठीतून काढून टाकायची आवश्यकता असल्याचे गोखले ह्यांनी म्हटल्याचे वाटत नाही.
मूळ मुद्दा आहे की, दर वाक्यात येणाऱ्या प्रत्येक १० शब्दांपैकी आपण मराठी शब्द किती वापरतो ?
जे रुळलेले शब्द आहेत त्यांचा वापर / उपयोग / सिद्धता / तांत्रीकबाबी वगैरे वगैरे हा वेगळा वादाचा मुद्दा असावा...
पण जे शब्द कमीत कमी रुळलेले असल्याचे मान्य झाले / केले आहे; त्यापैकीही आपण किती शब्द रोजच्या वापरात आणतो ?

वडुलेकरांनी पल्लवी जोशी (मराठी सारेगमप ) चे उदाहरण खाली दिले आहे त्यावरून एक जाणवते की, पल्लवी ही काही नवतरुणी नाही ! साधारण ४० वर्षाच्या वयाच्या स्त्री/पुरुषांना मराठीचा वापर कसा करावा, हे शिकवावे लागणे किंवा त्यावर जोर देणे हाच काळजीचा विषय होऊ शकेल.

इंग्रजी/इंग्लिश ह्या मुद्द्याबाबतही अमिबांशी सहमत आहे. पण काही गैरसमजांमुळे माझ्याही तोंडात इंग्रजी हाच शब्द रुळलेला होता..... ह्या मुद्द्याची सार्थता पटल्यावर असेच म्हणावेसे वाटते की, ह्या पुढे इंग्रजी हा शब्द न वापरता इंग्लिश हाच शब्द वापरणे बरोबर आहे.

माझ्या मते मूळ मुद्दा (गोखले ह्यांनी मांडलेला) हा रुळलेल्या मराठी शब्दांविषयी नसून नवीन दारातून येणाऱ्या हिंग्लिश (हिंग्रजी नाही !) शब्दांबद्दल आहे / असावा.

आधीच आपल्या माय मराठी च्या शुध्दाशुध्दतेबद्दल साशंकता आहे; त्यातच हे असे हिंग्लिशाळलेले मराठी वाचन आवडणारे नाही, ह्याबद्दल तरी दुमत नको !

एक मात्र प्रांजळपणे मान्य करतो की...... गेल्या दोन - सव्वा दोन वर्षांच्या मनोगतावरील सहभागामुळे माझे मराठी थोडे तरी सुधारले आहे व शुद्धलेखन तपासून प्रतिसाद देण्याची सवय अंगवळणी पडली आहे.

ह्या चर्चेचे फलित काय हे सांगणे कठिण होईल परंतु संगणकावर मराठीचा वापर करणाऱ्या तुम्हाआम्हां सारख्यांनी जरी शुद्धतेची कास धरली तरी मराठी तगून राहण्यासाठी काही प्रयत्न केल्याचे समाधान होईल असे म्हणावेसे वाटते.