इतर देशांत काय चालले आहे व तेथल्या पारंपारीक बोलींवर इंग्लिशचा प्रभाव कितपत पडला आहे हे जर भारताबाहेरील मनोगतींनी सविस्तर लिहील्यास हा प्रादुर्भाव फक्त मराठीला झाला की इतर आंतरराष्ट्रीय भाषांनाही झाला हे कळेल !

हाच प्रयत्न मी केला, पण 'भयंकर धाडसी विधाने' असे म्हणून तो बाजूला टाकला गेला! मी गेली अनेक वर्षे आग्नेय आशियातल्या एका देशात राहतो आहे, व मी जे लिहिले, ते त्या देशातील माझ्या आजवरच्या अनुभवावर आधारित आहे, तसेच मला जगाच्या ह्या भागाच्या इतर देशात जे अनुभव आले/ येतात, त्यावर. आता अर्थातच हे सगळे ऍनेकडोटल आहे, हे खरे. पण अशा चर्चेत बरेच काही असेच असणार आहे. इथे सर्वच विधानांना शास्त्रीय पुरावे देता येणे अशक्य आहे, (आणि तसे इतर कोणी दिले आहेत?) तेव्हा एकमेकांच्या वैयक्तिक माहितीवर थोडाफार भरवसा ठेवणे अपरिहार्य आहे. मी जी विधाने केली, त्यांबद्दल मी ठाम आहे.

ठोस उदाहणे देऊनही ( व त्यात मराठी- गुजराती हेही आले) माणसे जेव्हा 'हे सगळे जावू द्या हो, मी म्हणतो तीच बॉटम लाईन' असे म्हणणार असतील, तर काय म्हणणार?

मुळात मराठी वर्तमानपत्रे जे असे मराठी लिहितात, त्यामागचे अर्थशास्त्र उघड आहे. असे करत करत त्यांनी किती खाली जावयाचे, हे त्यांचे त्यांनी ठरवायचे. भाषा प्रवाही असणे ह्याबाबत दुमत नाही. पण तसे करतांना मूळ भाषेची विनाकारण मोडतोड करावी का, हा प्रश्न आहे.

चित्त ह्यांनी जो संस्कृताळलेल्या मराठीचा मुद्दा मांडला आहे, तो एकदम मान्य. जर परदेशस्थ मराठी पांढरपेशे असे करत असतील, तर ते वाईटच. पण त्याचा परिणामही अत्यंत छोटासा राहिल, व तसे प्रयत्न आपोआपच मरून जातील. पण शासकीय मराठीचे, जिच्यावर हिंदीचे (व तेही संस्कृताळलेल्या) आक्रमण होते आहे, त्याचे काय? काहीच दिवसांपूर्वी मनोगतावरच खडकी येथील पोलिसठाण्यावर जी पाटी आहे, तिच्यातील शब्दांचा अर्थ नकी काय आहे, अशा अर्थाची एक चर्चा झालेली आठवते. जडजंबाळ शब्दात लिहिलेली ती पाटी जर शिकल्यासवरलेल्या लोकांना समजवून घ्यावयाला बरेच कष्ट पडत असतील, तर आम जनतेचे काय? 'आम जनता तिकडे लक्ष देत नाही हो.......' असा 'विनोदी' प्रतिसाद येईल ह्यावर, पण मग कसलीही चर्चा करण्याचे कारणच उरत नाही. शेवटी 'हे जे सगळे चालले आहे, त्यात गैर असे काहीही नाही' अशी भूमिका, अथवा अगदी टोकाची हताश भूमिकाच जर आपण स्वीकारणार असू, तर काहीही म्हणण्यासारखे नाही.  वास्तवाला आहे तसे सामोरे जाणे (प्रॅग्मॅटिझम) मलाही समजतो. पण त्याचा कधीकधी अतिरेक केला जातो. काही लोक लग्नाच्या निमित्ताने मोठ्ठी रोषणाई करून, फटाक्यांच्या धूमधडाक्याने, हजारांच्या जेवणावळी घालतात, त्याचीही 'ह्यामुळे अनेक रोजगार उपलब्ध होतात ना?' अशी भलावण केली जातेच, तो ह्यातलाच प्रकार!