गेले अनेक दिवस लोकसत्ता मधली एक पानभर येणारी जाहिरात वाचनात येत होती. भारताचे आगामी राष्ट्रपती कोण असतील याबाबत आयबीएन वाहिनी व इंडियन एक्सप्रेस समूहाने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष मराठी वाचकांसाठी २७ मे च्या लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध होतील असा जाहिरातीचा अर्थ आहे. ही संपूर्ण जाहिरात हिंदीमध्ये आहे. मराठी वाचकांसाठी मराठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात हिंदीमध्ये कशासाठी? हा लोकसत्ता आहे की जनसत्ता? की मराठीमध्ये भाषांतरित करण्याची गरजच त्यांना वाटली नसावी.
तीच गोष्ट लेनोवो या लॅपटॉपची... तीच गोष्ट बीएसएनएलच्या तरंग या योजनेची.. तीच गोष्ट अल्फा मराठी-ईटीव्ही मराठी-मी मराठी या वाहिन्यांवर येणाऱ्या शेकडो जाहिरातींची आहे. १५-२० टक्के जाहिराती या मराठीतून असतात बाकी सगळ्या जाहिराती हिंदीतून आहेत.

उदय टीव्ही व ईटीव्ही कन्नडा या दोन वाहिन्या गेले काही महिने मी पाहत आहे. या वाहिन्यांवर हॅवेल्स फॅन ची जाहिरात वगळता एकही जाहिरात हिंदीतून नाही. हॅवेल्सची जाहिरातही "एकदम अल्टिमेट आराम" वगैरे केवळ एक-दोन वाक्यांची आहे.

पुण्यातील एफ-एम वाहिनीने गेल्या २-३ वर्षांमध्ये जत्रा चित्रपटातील ये-गो ये मैना पिंजरा बनाया सोनेका हे एक, अगबाई अरेच्चा मधील छम छम करता है ये नशीला बदन हे एक आणि लोकप्रिय ढगाला लागली कळ हे एक अशी केवळ तीन "मराठी"गाणी पुण्यातील स्थानिक जनतेला ऐकवली आहेत. या एफ-एम वाहिनीवरील निवेदन कोणत्या भाषेत आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पुण्यापेक्षा अधिक कॉस्मोपॉलिटन असलेल्या बेंगळूरुमधील परिस्थिती काय आहे ते येथे वाचा.  सोबत एका लोकप्रिय कन्नडिग पत्रकाराचा आयबीएन वर्तमानपत्रात येणारा ब्लॉगही वाचा. 

आता बेंगळुरूमधील सर्व एफ-एम वाहिन्या प्राधान्याने कन्नडामधून व काही वेळ इंग्रजीमधून निवेदन करतात शिवाय कन्नडा गाण्यांना अधिक प्राधान्य देण्यात येते ते वेगळेच. पुण्यामधली परिस्थिती किती वेगळी आहे.

(महाराष्ट्रात असलेल्या मुंबईला मराठी म्हणणेही आता हास्यास्पद ठरले आहे. एका "मुंबईकराने" उधळलेली मुक्ताफळे  येथे  वाचा...)






येथे एक गोष्ट कटाक्षाने ध्यानात घ्यावी की विकिपीडिया मधील नोंदींनुसार कन्नड ही "नेटिव्ह" भाषा असलेल्यांची संख्या ३३ दशलक्ष आहे. व मराठी ही "नेटिव्ह" भाषा असलेल्यांची संख्या ६६ दशलक्ष म्हणजे दुप्पट आहे.

महाराष्ट्रात, अमेरिकेत -म्हणजे परप्रांतात - राहणाऱ्या मल्याळी, कन्नडिगांना त्यांची मातृभाषा नीट येत नाही... ते पण धेडगुजरी भाषेत बोलतात म्हणून आपल्या वूत्तपत्रांनीही तशीच भाषा वापरली तर काय बिघडले हा बादरायण संबंध समजला नाही.

या विषयात अधिक रस असणाऱ्यांनी कर्नाटकातूनच प्रसिद्ध होणारी कन्नडप्रभा, विजय कर्नाटका ही वूत्तपत्रेही पहावीत आणि त्यात येणाऱ्या हिंदी - इंग्रजी बातम्या, जाहिरातींचा तुलनात्मक अभ्यास करावा.