माझ्यामते न्यूनगंड हा एक प्रमुख घटक आहे या प्रश्नाचा. वृकोदरांनी म्हटल्याप्रमाणे नवीन नावे रूढ न होण्यामागे तर याचा हातभार आहेच पण मराठीचा र्‍हास होण्यात पण न्यूनगंड कारणीभूत आहे. ह्या गोष्टीचे फार स्पष्टीकरण द्यायची तशी काही गरज नाहिये फारशी. फाड फाड इंग्रजी बोलणार्‍यांच्या पुढे मराठमोळे चेहरे (काही सन्माननीय अपवाद वगळता) कसे कसनुसे होतात त्याची अनुभूती अनेकदा घेतलीच असेल सर्वांनी. (खरेतर हे लोक पण इंग्रजी काय दर्जाचे बोलतात हा दुसरा मुद्दा (पुन्हा स. अ. व.)

ज्ञानभाषा म्हणून मातृभाषेचा स्वीकार होत नाही त्यामुळे लहानपणापासूनच मातृभाषेचा संस्कार होत नाही. मायमराठीचा सहवासच नाही तर लळा काय डोंबल लागणार? अशा वेळी मोठेपणी मुलांनी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला तर दोष कुणाचा? लहानपणी आईचा सहवास मिळणे हे किती गरजेचे आहे हे कुणी वेगळे सिद्ध करायची गरज नसावी. आया शेवटी आयाच असते. (पुन्हा स.अ.व.)

आजच्या तरुण वर्गात "मला मराठी झेपत नाही बाबा...! " हे वाक्य इतक्यांदा ऐकायला मिळते की आपणंच काहीतरी पाप करतोय असे वाटायला लागते. एकूणच मुंबई सारख्या महानगर आणि आसपासच्या परिसरात जेथे परभाषिकांचे जास्त वास्तव्य असते तेथे मराठीची परिस्थिती कठीणच आहे. कदाचित ही काळाची गरज आहे. पण...

... भाषा ही केवळ भाषा नसते ती संस्कृती, संस्कार, परंपरा या सगळ्यांशी जोडलेली असते. त्यामुळे भाषेचा र्‍हास हा बर्‍याच मोठ्या र्‍हासाकडे अंगुलीनिर्देश करतो. इंग्रजीच्या मांडीवर बसून 'मातृ देवो भव' कधीच कळणार नाही. दोन दोन भिन्नस्वभावी मातांच्या तावडीत सापडलेली बालके अशी संभ्रमित नाही झाली तरंच नवल. त्यामुळे माझ्यामते जर आपली संस्कृतीच कालबाह्य वाटत असली तर प्रश्नंच नाही आणि जर अजूनही ती हवी हवीशी वाटत असली तर उत्तर स्पष्ट आहे.

आपला
(मातृभक्त) ॐ