सर्व प्रतिसादींचे मनापासून आभार.
मुळात 'एक कथा' म्हणून ही लिहायला घेतली. दोन तास झटूनही शेवट दिसेना तेव्हा नाइलाजाने 'भाग १' हे शेपूट जन्माला आले. नंतर एकेक भाग लिहिण्याच्या नादात मूळ कल्पना बरीचशी बांधावर बसली आणि नांगरट तिसऱ्याच कुणाची सुरू झाली. थोडक्यात म्हणजे, वाहवत गेलो! ('बरखा बजाज' हे प्रकरण एका परिच्छेदात होईल असा प्राथमिक अंदाज होता. सातव्या भागातही मोरारजींचा मस्तकशूळ उठवण्याचा मूळ बेत नव्हता).
वेळेची चणचण इतकी भासेल याचीही काहीच पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे पाणी डोक्यावरून जातेय असे वाटल्याबरोबर थोड्याशा घायकुतलेल्या अवस्थेत 'पूर्णविराम देऊन टाकला'.
लिखाणाची नशा मात्र त्या छोट्याशा कालावधीत पुरेपूर अनुभवली. अधून-मधून withdrawal symptoms येताहेत अजूनही!
एकंदरीत हा प्रकार ठरवून करण्याऐवजी घडून मग ठरला. त्यामुळे मध्येच जरा हुका-झूक झाली. अजून दोन भाग लिहून मनात असलेले कथानक तरी पूर्ण करावे असा विचार (अजूनही) आहे. पाहू या.
टीप: या कथानकातील बरीचशी पात्रे खरी आहेत. पण त्यांनी घाऊक प्रमाणात स्थलांतर, नामांतर, वयबदल, लिंगबदल, स्वभावबदल असे सर्व एकदम केले आहे.