स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - नुसते नाव ऐकले तरी मन थरारून उठते.
"सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरेतो झुंजेन" - ही वयाच्या दहाव्या - बाराव्या वर्षी
प्रतिज्ञा घेणारा आणि जन्मभर त्याप्रमाणे वागणारा हा सूर्य आम्हा पामरांना सहन झाला नाही.
त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्व नजरेत मावण्याइतके आम्ही कधी उंच झालो नाही.
"प्रतिकूल तेच घडेल" - ही अदम्य प्रयत्नवादी भूमिका आम्हाला कधी पचलीच नाही.
"सागरा प्राण तळमळला" म्हणणारी तळमळीची प्रतिभा आम्हाला कधी उमजलीच नाही.
आम्ही बसलो - कवटाळत - आमच्या झापडे लावलेल्या मूढ संकल्पनांना -
"सावरकर म्हणजे अंदमानी काळ्या पाण्याला घाबरून इंग्रजांकडे क्षमायाचना करणारा पळपुटा"
"सावरकर म्हणजे द्विराष्ट्रवादाची बीजे रोवणारा फुटिरतावादी"
"सावरकर म्हणजे महात्म्याच्या हत्येच्या कटातून पुराव्याअभावी सुटलेला"
सूर्याला डाग लावून त्याला अस्तंगत करण्याचा अभद्र प्रयत्न आम्ही करत राहिलो.
अजूनही करतोच आहोत.
त्याची 'अभिनव भारत' आम्ही विसरलो.
त्याची मार्सेलीस बंदरातली उडी आम्ही विसरलो.
त्याची दलितोद्धाराची चळवळ, त्याचे पतीतपावन मंदिर आम्ही विसरलो.
त्याचे कोलू ओढणे, त्याचे काथ्या कुटणे आम्ही विसरलो.
त्याची 'गाय हा उपयुक्त पशू आहे' म्हणणारी विज्ञानवादी भूमिका आम्ही विसरलो.
सोयिस्कररित्या! कारण त्याच्या विचाराप्रमाणे वागणे आम्हा लव्हाळ्याना शक्य नाही.
आम्ही फक्त आठवणीने साजरी करतो त्यांची 'क्ष'वी जयंती आणि मयंती!
आणि घालतो निर्लज्जपणे झेंडूचे हार त्याच्या प्रतिमेला.
बा! विनायका, आम्हाला क्षमा कर, आम्ही काय करतो आहोत ते आम्हालाच कळत नाही.