आपण सगळ्यानी दिलेल्या शुभेछा पूरियाला, माझ्या मुलीला पोहोचवल्या. धन्यवाद. हा अनुभव सकाळ च्या मुक्तपीठ मध्ये देखील छापून आला आहे. त्यावर बऱ्याच वाचकांच्या प्रतीक्रियाही आल्या. त्यातील एक खाली देत आहे.
उज्ज्वला गांधी)
दोन मार्च २००७ रोजी मी एका विलक्षण अनुभवाची साक्षीदार बनले. नेहमीप्रमाणे ऑफिसला जात असताना गरवारे पुलाजवळ एका सतरा-अठरा वर्षांच्या मुलीला जोरदार अपघात झाला. .....
तिची दुचाकी व शेजारून जाणाऱ्या एसटीची धडक होऊन ती गाडीसह रस्त्यावर पडली. तिच्या मांडीवरून एसटीचे चाक गेले. हाड मोडल्याने तिला उठता येत नव्हते. मुलगी फारच सहनशील होती त्यामुळे त्या भयंकर वेदनांतही तिने फार गोंधळ केला नाही.
इतर लोकांप्रमाणेच मीही तिला जमेल तशी मदत करीत होते. मी तिच्याबरोबर संचेती रुग्णालयात जाऊन तिला डॉक्टरांच्या ताब्यात दिले. आमच्या मागोमाग एक तरुण तिथे पोचला. मुलीचे पालक जयंत जेस्ते यांनी आम्हा तिघांचा-मी, तो तरुण राहुल बिनीवाले व रिक्षाकाका लहू चव्हाण यांचा घरगुती कौतुक समारंभ तर केलाच पण "मुक्तपीठ'द्वारे (२३ एप्रिल ०७) जाहीर आभारही मानले.
या घटनेतून मला झालेली जाणीव मी तुमच्यापर्यंत पोचवू इच्छिते. अपघात पाहिल्यानंतरही आपण स्वतःहून कधी त्यात पडत नाही. यापूर्वी मीही त्यातील एक होते. पण हा अपघात माझ्या इतक्या नजरेसमोर घडला की झटकन स्वतःची गाडी बाजूला घेऊन मी तिच्या जवळ गेले. त्याक्षणी माझ्या मनात दुसरी कुठलीही भीती, शंका किंवा विचार आला नाही. आपण थांबून काय करू शकतो, या प्रश्नालाही त्याक्षणी थारा नव्हता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मदत केल्याचा मला कसलाही त्रास झाला नाही. कोणत्याही पोलिस चौकीला उत्तरे द्यावी लागली नाहीत. रुग्णालयातही कोणतीही कागदपत्रे, सह्या, आगाऊ रक्कम न घेता उपचार सुरू झाले.
आपण केलेली मदत आपल्यालाच अडचणीत आणते, असे प्रत्येकवेळी घडत नाही. त्यामुळे पूर्वी कधी कुणाला सामोरे जावे लागलेल्या ससेमिऱ्याला किंवा त्रासाला घाबरून आपण कधीच कुणाला मदत करायची नाही, ही भूमिका अयोग्य आहे. कितीही घाईत असलो तरी गरजू व्यक्तीला मदत करावी कारण आपल्याला किंवा आपण जिवापाड प्रेम करीत असलेल्या व्यक्तीलाही कधीतरी अशा मदतीची गरज भासू शकते.
त्या तरुणीला मदतीच्या घटनेनंतर माझ्या घरातून, सासू-सासऱ्यांकडून मला प्रोत्साहन तर मिळालेच पण मित्रमैत्रीणींतही त्यावर सखोल चर्चा होऊन, यापुढे अशा प्रसंगी मदतीला धावून जायचेच असा अलिखित नियमही झाला. एरवी समाजकार्यासाठी वेळ काढता येत नसला तरी अशा प्रसंगातून समाजाच्या ऋणाचे आपण उतराई होऊ शकतो. किंबहुना अशी संधी देण्यासाठीच कोणीतरी प्राण पणाला लावले आहेत असे समजून त्याच्या हाकेला तुमच्या सर्वस्वाने "ओ' द्या आणि माझ्यासारखेच तुम्हीपण समाधान मिळवा.