नमस्कार!

मग रोजच्या वाचताना मग जनरेटरसाठी जनित्र, काउन्सलरसाठी समुपदेशक असे शब्द आडवे येतात.

मग पूर्वीही जेव्हा सावरकरांनी नगरसेवक, महापौर, दिग्दर्शक इ. शब्द वापरायला सुरुवात केली तेव्हा त्या काळच्या लोकांना ते शब्द असेच आडवे येत असतील. तेव्हा त्यांनी आग्रह धरला नसता, तर आज़ नागरिकशास्त्रातील कित्येक सुंदर व अर्थवाही शब्दांना आपण मुकलो असतो. (उदा. कॉर्पोरेटर हा शब्द व संकल्पना दोन्ही परकेच, पण नगरसेवक हा देशी शब्द ती परकी संकल्पना त्या परक्या शब्दापेक्षाही अधिक योग्यतेने व्यक्त करतो!)

मुद्दा हा की नवीन शब्द हे 'तयार' करावे लागतात, आणि ते वापरायला कुणी तरी कधी तरी सुरुवात करावी लागते.

केवळ आपल्या बालपणी जितके मराठी शब्द आपल्याला ठावूक होते तितकेच तेवढे स्वीकारार्ह असे म्हटले तर भाषेत वाढ होणार तरी कशी आणि कधी?

आणि परक्या संकल्पनांसाठी देशी प्रतिशब्द काढूच नयेत हे म्हणणे अतिशय टोकाचे झाले. जिथे शक्य तिथे ते का तयार करू नयेत? वरती signal शब्दासाठी जे उदाहरण दिले आहे ते केवळ अतिशयोक्तीचे आहे, आणि जे लोक संस्कृतला केवळ विनोदविषय समज़तात ते लोक अशी भाषांतरे मनोरंजनासाठी म्हणून सांगत असतात.

विधानसभा, लोकसभा, राष्ट्रपती, उत्कलनांक, जडत्व, दूरचित्रवाणी हे शब्द त्या त्या अभ्यासशाखांमध्ये आज़ ज्या अर्थाने प्रचलित आहेत त्याच अर्थाने ते पूर्वी संस्कृतमध्ये नव्हते हे नक्की. त्यातील काही संकल्पना या तर नक्कीच पूर्ण परक्या आहेत. पण तरीही आता पुरेशा वापरामुळे हे शब्द कानांना परके वाटत नाहीत. आणि हा केवळ संस्कृतमधून शब्द तयार करण्याविषयीचा मुद्दा नाही. आमदार, खासदार हे शब्द मराठीत होते का? पण ते आता प्रचलित झालेच ना?

अर्थात अगदीच अतिरेक करून toothbrushला दंतझाडणी इ.सारखे प्रतिशब्द बनवायची गरज़ नाही. (यासंदर्भात जयंत नारळीकरांनी अनेक वर्षांपूर्वी 'आकाशाशी ज़डले नाते' या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर उठलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी म. टा. मध्ये लिहिलेला लेख उत्तम आहे.) त्यामुळे उगीच कुणीही अर्धवट ज्ञानाने उठसूठ बनवलेले प्रतिशब्द मान्य करायचे कारण नाहीच. नाही तर मग रस्त्यावर "Speedbreaker ahead"चे भाषांतर हे "गतिरोधक पुढे आहे" असे होते. ("गतिरोधक पुढे आहे" आणि "पुढे गतिरोधक आहे" या वाक्यांतील फरक आपल्या ध्यानात येइलच!) किंवा "Work in progress"या पाटीसोबत "कामात प्रगती आहे" अशी मराठीतील पाटी दिसते! (अर्थात तरीही, केवळ "Speedbreaker ahead" ही फक्त इंग्रजी पाटी ठेवण्यापेक्षा थोडी चुकीची का असेना, पण मराठीतील पाटीही लावण्यासाठी हट्ट हवाच!)

ज़र नवीन संकल्पनांना प्रतिशब्द वापरायचेच नाहीत असे ठरवले, तर मग मराठी भाषा ही लवकरच English भाषेचा एक dilect बनून ज़ाईल. कारण अर्थातच आज़च्या काळात नव्याने येणार्‍या बहुतांश संकल्पना या पाश्चात्त्य आहेत, ज्ञानाचा तिकडून इकडे वाहाणारा ओघ हा इकडून तिकडे वाहाणार्‍या ओघापेक्षा बराच मोठा आहे. त्यामुळे बहुतांश नवीन संकल्पना या पाश्चात्त्य, व विशेषतः Englishमधून आलेल्या आहेत, येत आहेत. त्या केवळ तशाच घ्यायच्या म्हटल्या, तर मग मराठी ही निव्वळ बोलीभाषा म्हणूनच उरेल. (म्हणजेच मरणासन्नतेच्या एक पायरी आणखी ज़वळ!) आणि त्यातही निम्मे शब्द English उरतील - क्रियापदे, विशेषणे, अव्यये इ. काही भाग वगळता!

उलट जे शब्द आपण परके उचलले आहेत (ज़से की पेन, टूथब्रश), त्यांचेही मराठीकरण करणे आवश्यक आहे. (म्हणजेच थोडक्यात त्यांना मराठी भाषेच्या प्रकृतीप्रमाणे लिंगे देणे, आणि त्यांना चालवताना त्यांची 'सामान्यरूपे' करणे. ज़से की पेनाला, पेनाने इ.) तर ते शब्द आपल्या भाषेत रुज़ले असे म्हणता येइल. (ज्या पर्शियन किंवा अरबी शब्दांची मराठीतील परके शब्द म्हणून उदाहरणे देण्यात येतात ते वास्तवात आता पुरते मराठी बनले आहेत, असे मराठीत रुज़ले आहेत हे कृपया ध्यानात घ्या. ज़से की दप्तराला, तालुक्याला इ.)

(आता पुढला भाग इथून उचलला आहे.)

भाषाशुद्धीविषयी.

इंग्रजी भाषा नष्ट होण्याची भीती ही अतिशयोक्ती झाली. उलट नवीन नवीन भाषांतून शब्द पचवून ती अधिक बलवान होत आहे. आणि तिच्या वर्णलेखनाला (spellings) कोणताही मूलभूत धक्का पोचलेला नाही. मुख्य म्हणजे ती जेथील मूळ भाषा, त्या इंग्लंडमध्ये तिच्या शुद्धतेविषयी कुणी तडजोडी करत नाही.

संस्कृत भाषेच्या मरणासन्नतेचे कारण हे तिची शुद्धता किंवा व्याकरणावरचा भर हे नव्हते. त्याला अन्य सामाजिक, आर्थिक व राजकीय कारणे होती.

मुख्य म्हणजे भाषा बोलणार्‍यांना त्या भाषेविषयी किती आस्था आणि आपुलकी आहे हे त्यांच्या त्या भाषेतील लेखनावरून दिसते.

आपण इंग्लिश, जर्मन अशा परक्या भाषांतील वर्णलेखनाचे नियम मुकाटपणे पाळतो, त्यासाठी घोकंपट्टीही आपल्याला मान्य असते. परंतु स्वतःच्या भाषेबाबत गुळचटपणा आणि तडज़ोड आपल्याला मंजूर असते.

आज़ शुद्धलेखनाविषयी केलेली तडज़ोड उद्या व्याकरणाविषयी आणि परवा लिपीविषयी होणार हे निश्चित. (रोमनमधून मराठी?!) म्हणूनच केवळ आंग्लमाध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनेक मुलांना आज़ मराठी वाक्यरचना नीट करता येत नाही; दुसर्‍यांनी केलेली समज़त नाही. (उदा. एक अतिसामान्य चूक: "ज़र असे असल्यास". इथे "ज़र असे असेल तर" हवे किंवा "असे असल्यास" असे हवे.) व्याकरणाशी किती तडज़ोड करावी यालाही काही मर्यादा हव्यात. परभाषिकांबाबत सहनशीलता ठीक आहे, किंबहुना ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असतील तर ते स्वागतार्हच आहे, पण आपण आपल्याच भाषिकांना भाषेची मोडतोड करायला किती परवानगी द्यायची हे ठरवायला हवे.

भाषेचे भवितव्य हे केवळ ती कशी व किती बोलली ज़ाते, यावर केवळ अवलंबून नसून त्यात कसे, काय व किती लिहिले ज़ाते यावर अवलंबून आहे.

अर्थात भाषा मूलतः संवादाचे माध्यम आहे, आणि ती प्रवाही नसेल तर नष्टप्राय होणारच हे मात्र नक्की. यासाठीच इंग्रजी भाषेच्या लवचिकपणापासून आणि तरीही प्रमाणीकरणाच्या आग्रहापासून काही शिकायला हवे.

आपला,

(अर्थातच) मराठा