नमस्कार!
या ठिकाणी आपण जे म्हणत आहात ते नक्की का?
कारण माझ्या आज़तागायतच्या कल्पनेप्रमाणे 'दुरितांचे' हा शब्द 'दुरित' शब्दाचे षष्टी अनेकवचन आहे. आणि तसे असेल, तर मग तो अनुस्वार अनुच्चारित असण्याचे काहीच कारण नाही.
अनुच्चरित अनुस्वार म्हणजे उदाहरणार्थ, आपण सध्या जिथे हलन्त वापरतो ते: ज़से की, "मी म्हटलं उत्तर द्यावं" हे पूर्वी "मी म्हटलें उत्तर द्यावें " अशा प्रकारे लिहिले ज़ात असे, आणि (काही विशिष्ट लोकांच्यात तरी!) तसेच उच्चारलेही ज़ात असे. पण बहुतांश लोकांना हे अनुस्वार उच्चारणे कठीण ज़ात असे, आणि त्या अनुस्वारांमुळे विशेष काही साधलेही ज़ात नसे. (अर्थात सत्त्वशीला सामंत यांनी त्या अनुस्वारांची किंवा एकूणच काही ज़ुन्या व्याकरणनियमांची आवश्यकता काय याविषयी अत्यंत प्रभावी विवेचन केलेले आहे. तो वादविषय असू शकतो.)
पण पसायदानातील हा अनुस्वार अनुच्चारित आहे हे मला माहिती नव्हते.
आणखी कुणी अभ्यासू यावर प्रकाश टाकेल काय?
आपला,
(चौकस) मराठा