नमस्कार!

तुमचा प्रतिसाद आवडला. तुम्ही भाषाशास्त्री दिसता. 

धन्यवाद. परंतु मी भाषाशास्त्री नाही!

जी भाषा बदलत नाही ती मरते. 

एकदम मान्य. (परंतु भाषेच्या मरणामागे तितके एकच कारण असते असे नव्हे!)

आणि म्हणूनच तर मराठीच्या शब्दसंचयातही वाढ करण्याचा, तिच्यात गरज़ेचे तिथे बदल करायचा आग्रह.

जग काही हजार वर्षांनंतर नक्कीच एकाच भाषेत बोलणार आहे. प्राकृत, गुजराती, पंजाबी, तमिळ, बास्क इत्यादि भाषा केवळ त्या प्रवासातील काही पडाव आहेत, असे माझे ठाम मत आहे. शेवटी जग एकसंध होणारच.

जग खरोखर एकसंध होणार की नाही हे माहिती नाही.

पण सध्याच्या बहुतेक सर्व भाषा या काही हज़ार वर्षांनंतर असणार नाहीत हे मान्य आहे.

परंतु हे असे माहिती असले, तरी आपल्या हयातीतच त्या मरू नयेत यासाठी प्रयत्न करण्यात, किंवा किमान त्यांच्या मरणाला आपणही हातभार लावणारे होवू नये यासाठी प्रयत्न करण्यात काही गैर नाही.

उदाहरणार्थ, 'मनुष्य मर्त्य आहे' हे त्रिकालाबाधित (किमान द्विकालाबाधित तरी नक्की!) सत्य आहे. परंतु तरीही आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करायचे कमी करत नाही. तसेच पुढे कधी मराठी नक्की मरणार ज़री असली, तरी आपले तिच्यावर प्रेम असणारच.

दुसरे म्हणजे, आपणही मरणार हे पक्की माहिती असले, तरी जिवंत आहोत तोवर आपण व्यायाम करतो, शरीराची काळजी घेतो, आहारावर नियंत्रण ठेवतो, आज़ारी पडलो तर औषधपाणी करतो. याचे उद्देश दोन असतात: एक तर त्यामुळे मरण ज़रा तरी दूर ज़ाईल अशी आपली समज़ूत असते, आणि दुसरे म्हणजे आपण जिवंत आहोत तोवर तरी ज़गण्याला काही एक किमान दर्जा असावा, जगणे सुंदर व्हावे अशी आपली इच्छा असते.

मराठी ज़गवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्देश हेही असेच आहेत!

तिसरे म्हणजे, ज्याप्रकारे संस्कृती ज़गवण्यासाठी प्रयत्न करण्याचा उद्देश हा उद्याच्या जगाच्या संस्कृतीत आपल्याही संस्कृतीचा काही अंश असावा हा आहे, तसाच मराठीचे मरण लांबवण्यासाठी व तिला बलशाली बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचा उद्देश हा कदाचित उद्याच्या जगाच्या भाषेत तिचा काही अंश उरावा हा आहे.

(याचे, म्हणजे मूळ भाषा टिकण्याचे, एक उदाहरण म्हणजे ग्रीक भाषा. आज़ची आधुनिक ग्रीक भाषा ही ज़वळपास गेली पंधराशे वर्षे तशीच आहे. तेव्हाच्या ग्रीक साहित्यातील भाषा आणि आज़ची ग्रीक लोकभाषा यांत अगदीच किरकोळ फरक आहेत. ग्रीक भाषा काळाच्या कसोटीला इतकी वर्षे टिकली आहे!)

संस्कृत शेतकऱ्यांची, कामकऱ्यांची भाषा कधीच नव्हती. ती दरबाऱ्यांची, ब्राह्मणांची किंवा कुलीनांची भाषा होती.

हेही मान्य.

पण भाषेत काही तरी एक प्रमाण असणे आवश्यक असते.

आणि नवीन शब्दांसाठी संस्कृतकडे वळण्याचे कारण असे, की मराठीमध्ये असलेल्या अधिकतम शब्दांचा उगम तिच्याशी ज़ोडता येतो, आणि मराठीच्या वंशवृक्षातील अन्य कुठल्याही भाषांपेक्षा (प्राकृत, अपभ्रंशी इ.) संस्कृतचे सध्या उपलब्ध असलेले ज्ञान व विद्वत्ता (expertise) अधिक आहे! त्यामुळे तिच्यातून नवीन शब्द निर्माण करणे हा स्वाभाविक पर्याय आहे.

(ज़से बर्‍याच इंग्रजी पारिभाषिक संज्ञा या लॅटिन असतात किंवा बहासा इंडोनेसियातील नवीन शब्द हे बरेचदा संस्कृत असतात किंवा उर्दूतील पारिभाषिक संज्ञा या अरेबिक असतात तसे.)

बाकी एका वर्णाची किंवा एका भौगोलिक स्थळाची भाषा हीच प्रमाण असावी का हा निराळा वाद आहे. एका वर्णाची भाषा प्रमाण बनवण्यामागे राजकीय व सामाजिक कारणे अर्थातच आहेत. पण त्यापेक्षा खरे म्हणजे, तथाकथित प्रमाण भाषा बोलणारा वर्ण हा महाराष्ट्रात सर्वत्र आहे, आणि त्यामुळे ती भाषा सर्वत्र ऐकू तरी येते. अन्यथा मग नागपुरी मराठी की कोल्हापुरी मराठी की सोलापुरी मराठी की नगरची मराठी की सावंतवाडीची मराठी असा निष्कारण वाद होईल.

आणि निरनिराळ्या प्रांतातील लोक जी बोली भाषा बोलतात ती प्रमाणभाषेपेक्षा निराळी असली तरी फार वाईट वाटायचे कारण नाही. पण किमान चांगल्या भाषाव्यवहारासाठी काही तरी एक प्रमाण असणे गरज़ेचे आहे हे नक्की.

(फ्रेंच भाषा ही एकेकाळी युरोपातल्या कुलींनाची भाषा होती. अजून असावी.)

पण त्याची तुलना संस्कृतशी करण्याचे कारण नाही. फ़्रेंच ही युरोपातील अभिजनांची भाषा असेलही, पण ती खुद्द फ्रेंचांची - सर्वसामान्य फ्रेंचांची - (आणि त्यांच्या कित्येक पूर्ववसाहतींची) पूर्वीची व सध्याचीही भाषा आहे हे विसरायला नको.

बाकी जनपदांच्या मराठीतून प्रमाण मराठीत काही शब्द आणायला काही विरोध असायचे कारण नाहीच. भाषेला समृद्ध करणारी, परंतु तिचे अन्य भाषांवरचे अवलंबित्व कमी करणारी कोणतीही गोष्ट स्वागतार्हच आहे.

पण भाषा कधी तरी बदलणारच म्हणून मी अशुद्ध बोलणार, किंवा भाषा उद्यापरवा मरणारच म्हणून तिच्यासाठी झगडण्यात तथ्य नाही असे म्हणणे हा एक तर केवळ निवृत्तिवाद झाला, किंवा मग आपल्या जडत्वाच्या समर्थनासाठी फक्त निमित्ते देणे झाले!

बदल अटळ आहेतच, पण आपण आधीपासून ज़ाणीवपूर्वक प्रयत्न केले, तर त्या भविष्यातील बदलांना धन दिशा देता येवू शकते इतकेच.

आपला,

मराठा