हा प्रश्नच मला समजलेला नाही. सगळ्या लोकांनी व्याकरणदृष्ट्या शुद्धा भाषा बोलावी व लिहावी ही अपेक्षाच माझ्या मते मुळात अवाजवी आहे. इंग्रजीसकट कोठल्याही भाषेच्या बाबतीत हे तसे नसते हे मी इंग्लंडला गेल्यावेळी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. त्यामुळे कोणाला मराठीत इंग्रजी शब्द चालत नाहीत तर कोणाला फक्त संस्कृतजन्य शब्दच हवेत, हिंदी उर्दूचे सुद्धा वावडे आहे. तसे झाले की ओरड सुरू होते.
सावंतवाडी ते चंद्रपूर आणि डहाणू ते तुळजापूर असे उभे व आडवे महाराष्ट्रात फिरल्यास स्थानिक पातळीवर बोलल्या जाणाऱ्या भाषांचे अनंत प्रकार ऐकायला मिळतात त्यांना काय म्हणाल? संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या समजण्यासाठी सार्थ आवृत्ती घ्यावी लागते, इतकेच नव्हे तर देवल, किर्लोस्कर, हरि नारायण आपटे यांच्या नाटक कादंबरीत उपयोगात आणलेली भाषा कितीशा घरात आज बोलली जाते? शेक्सपीयरचे इंग्रजी तरी आजच्या किती लोकांना कळते?
भाषा ही स्थळकाळानुसार बदलत जाते व ती तशी जाणारच कारण तिचा मुख्य उपयोग आपल्या मनातील विचार, भाव इत्यादी दुसऱ्याला समजावा हाच असतो व ते करतांना माणूस ते कसे समजेल याचा विचार प्रथम करतो व भाषेच्या पावित्र्याचा नंतर. माझे हे लिखाणसुद्धा कुणाला अगम्य वाटल्यास मला त्याचे नवल वाटणार नाही.
जोपर्यंत माणूस दुसऱ्या माणसाबरोबर संवाद साधीत आहे तोपर्यंत भाषा बनत व बदलत जातील. संगणकाच्या विकासानंतर किती नव्या संकल्पना नवीन शब्दांसह किंवा जुन्याच शब्दांच्या नव्या अर्थासह आजच्या बोलण्यात आल्या आहेत. त्यांनी भाषा समृद्ध झाली का तिचा ऱ्हास झाला?