प्रशासकांनी काटछाट करण्याअगोदर मी हा लेख बघितला होता. त्यामुळे व लेखातील राहिलेल्या भागामुळे आपला रोख काय आहे, हे माझ्या सहज लक्षात आले आहे.

वैचारिक मैथुन (intellectual masturbatiuon) असे लिहिण्याचे धक्कदायक तंत्र नवे नाही, ते सुमारे २५ वर्षांपूर्वी वाचल्याचे आठवते. तसेच मनोगतावर नुकत्याच होऊन गेलेल्या चर्चेवर, त्या चर्चेत काहीही भाग न घेता, फक्त नंतर स्वैर मते प्रदर्शित करावयाची, हेही नवे नाही.

ह्याबद्दलची चर्चा अलिकडेच ''मराठी वर्तमानपत्रातील धेडहिंग्लीश मराठी भाषा" ह्या शीर्षकाखाली झाली. ह्या लेखात, त्या चर्चेत जी काही मते मांडण्यात आली होती, त्यांचा संदर्भ आहे.

जगात अनेक भाषांचा असाच ऱ्हास होत आहे व त्याबद्दल ओरडही अशीच आहे.

अनेक भाषा अश्याही आहेत, की त्या आपापले स्वत्व बऱ्यापैकी टिकवून आहेत--- मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून, चिनी भाषांची (मूळ चिनी, तसेच हाँगकाँग, सिंगापूर मध्ये बोलल्या जाणाऱ्या तिच्या बोली) उदाहरणे दिली होती. तसेच रशियन, जर्मन, जपानी ह्या भाषांच्या बाबतीत अशी 'रडारड' चालू असेल, असे वाटत नाही.

आर्थिक लाभ असेल तिकडे पळणे ही संस्कृती निदान गेल्या पन्नास वर्षात पूर्व आणि पश्चिम देशात वाढीस लागली आहे......अजूनही "लाभ व भाषा" हे नाते चुकीचे आहे असे वाटत असेल तर देशाटन करावे.

आर्थिक लाभ हा एक भाग झाला. त्याचबरोबर ती भाषा बोलणाऱ्या लोकांची मानसिकता काय आहे, ह्यावरही बरेच अवलंबून आहे. तसे नसते, तर मी उदाहरणे दिलेल्या भाषांच्याही आपल्या मराठीसारख्याच 'रडारडी' चालू झाल्या असत्या. तशा त्या बिलकूल नाहीत. 

मी चीनच्या उंबरठ्यावर राहतो. चिनी माणसांचा स्वतःच्या वंशाबद्दलचा व त्याच्या संस्कृतिबद्दलचा (मग त्यात भाषा, नृत्यप्रकार, साहित्य, चित्रकला, शिल्पकला, प्राचीन युद्धनीती, कसरतीचे प्रकार-- थाय छी, कुंग फ़ू इत्यादी--, प्राचीन वैद्यकशास्त्राचे प्रकार, वगैरे सर्व काही आले) अभिमान हा खरोखरीच 'जाज्वल्य' वगैरे आपण जे म्हणत असतो, त्या प्रतिचा आहे. म्हणूनच हे लोक स्वत्व: टिकवून आहेत. ते जगाच्या पाठीवर कुठेही असोत, आपापसात त्यांची भाषा बोलतात. अगदी कॅनडामध्ये लहानाची मोठी झालेली मुलेसुद्धा मोठी होऊन नोकरीच्या निमित्तने जेव्हा इथे परत आली, तेव्हा ती अगदी सहजपणे त्यांची मातृभाषा बोलू लागतात, हे मी बरेचदा प्रत्यक्ष पाहतो, ऐकतो.

आपल्या बंगाली माणसांचीही त्यांच्या भाषेबद्दल काही 'रडारड' आहे, असे ऐकिवात नाही.

तर एका बाजूला अशी ही चिनी, बंगाल्यांसारखी आपापल्या भाषेबद्दल 'दुराभिमान' म्हणावा इतका टोकाचा स्वाभिमान बाळगणारी माणसे' व दुसऱ्या बाजूला ' हे सर्व होणारच आहे, त्यात आपण काय करणार' असे म्हणत राहणारी कणाहीन सरपटणारी माणसे!

भाषा प्रवाही असते, हे खरे आणि तशी ती असलीही पाहिजे. पण त्याचा अर्थ असा नव्हे की उठसुठ नवे शब्द भाषेत घुसवायचे! ज्ञानेश्वरांच्या भाषेपासून जी स्थित्यंतरे होत गेली, ती काही आता होत आहेत तशी पाच पंधरा वर्षात झाली नाहीत. शिवाजीमहाराजांच्या वेळच्या बखरी वाचणे कठीण आहे, पण तो बदल जो झाला तो हळूहळू झाला. प्रवाही असणे म्हणजे गटार असणे नव्हे.

तर प्रश्न आपण किती सरपटणार, अथवा (कणा मोडलेला आहे, पण) तरी थोडासा उभा रहायाचा प्रयत्न करणार ह्यावर बरेच काही अवलंबून आहे.

हे शासनाचे काम आहे असे वाटत असेल तर भाषेचा ऱ्हास अटळ आहे हे मान्य करावे.

असे कोणी केव्हा म्हटले, हे मला माहित नाही. पण दोन गोष्टी सांगतो-- पहिली चीनबाबत (टाळता येत नाही!). पारंपारिक चिनी चित्रलिपीमध्ये सुमारे ९,००० मूळाक्षरे होती. चिनी सरकारने त्यांची संख्या सुमारे २/३ ने कमी केली. का? तर लोकांना लिहिणे, वाचणे सोप्पे व्हावे म्हणून. दुसरी आमच्याबद्दल. आम्हाला आमच्या सरकारकडून फार काही अपेक्षा नाही. 'लई नाही मागणं!'. फक्त दया एव्हढीच करावी, हिंदाळलेले मूर्ख शब्द आमच्यावर लादू नयेत. अर्ज 'नोंदवता' यावेत, 'पंजीकृत करणे' नकोत!

.....असे वाटत असेल तर देशाटन करावे.

म्हणजे काय होईल? तुम्हाला पटत नाही ना, मग तुम्ही इकडून जा दूर, हे सांगण्याचा उर्मटपणा कशासाठी? एक विरोधाभास असा की हे तुम्ही ज्या संकेतस्थळावर हे लिहिलेत, त्याची संपूर्ण मालकी एका देशाटन केलेल्या मराठी व्यक्तिची आहे!

प्रदीप