सकाळ मधले परीक्षण वाचून 'नमस्ते लंडन' बघावा असं ठरलं..मी, बायको, आई, वडील असे चौघं आयनॉक्समधे थाटात गेलो...तिकीट दर-१४० रुपये (फ़क्त!)...दर बघून "दरदरून" घाम आला (काही म्हणींचे अर्थ असे कळतात!)...तरीही मी मागे हटलो नाही. प्रेक्षागृह बघून दुसरा धक्का बसला. पडदा जेमतेम २० फुटांवर होता आणि कर्णकर्कश्य आवाजात गाणी लावली होती. म्हटलं निदान चित्रपट तरी बरा असेल. तिसरा धक्का : नामांकनात संगीतकार - हिमेश रेशमिया...(मनातल्या मनात "नहीSSSSSSSS" असं ओरडलो देखिल)

चित्रपटातली दृश्यं बघून कापूस उत्पादन कमी झालं की काय अशी शंका आली! दर २ मिनिटांनी पार्श्वसंगीत ऐकून संगीतकाराच्या पार्श्वभागावर लाथ मारावीशी वाटली. काही महाभाग आपल्या लहान मुलांना घेऊन आले होते, अशा चित्रपटांमुळे त्यांच्यावर काय संस्कार होणार देव जाणे.

चित्रपटगृहातून बाहेर पडताना मनाशी ठरवलं, आता हिंदी चित्रपट बघणे नाही.