तसे हिंदी चित्रपट अलिकडे फारसे बघत नाही. पण बायकोने 'गुरू' आणला. तो बघता बघता लवकरच माझी सहनशक्ति संपली. अधूनमधून मी इथे तिथे काहीबाही करत होतो, पण सगळा चित्रपट बघितल्यासारखे वाटले, म्हणजे काहीही मधले राहून गेले असे वाटले नाही.

दिग्दर्शक मणिरत्नम म्हणून कुणीतरी आहे, त्याचा मात्र बरेचदा कान जोरा SSSत पिळावासा वाटला. एकदोनच मासले देतो:

नायिका तिच्या प्रेमिकाकडून अव्हेरली गेल्यावर स्टेशनवर येते, व येईल त्या गाडीत बसून कुठेतरी दूर निघून जाते, हा सीन. कॅमेरा सुरुवातीला प्लॅटफ़ॉर्मच्या टोकाकडे अगदी जमिनीलगत, प्लॅटफॉर्म दाखवत. गाडी जशी स्टेशनात येते, तसा कॅमेरा क्रेनवरून फिरू लागतो. तो हळू वरती येतो, असे येतांना प्लॅटफॉर्मच्या कडेपासून थोडासा दूर होतो, आतल्या बाजूला. मग तो हळूहळू वर जातो, एकदम टॉप अँगल शॉट दाखवत. त्या शॉटमध्ये सर्व गाडी दिसते. ही सर्व सुमारे दहा पंधारा सेकंदाची कसरत कशाला? पत्ता नाही! ही व्यर्थ कसरत करायला बराच वेळ व पैसा गेला असणार.

दुसरा सीन, नायिका रुसून आपल्या माहेरी निघून गेली आहे, व नायक तिला भेटायला शहरातून थेट गाडी घेऊन आला आहे. तो गाडी घेऊन बंगल्याच्या अंगणात प्रवेश करतो, हे नायिका वरून बघते, व आवेगाने ती जिना उतरून त्याला मिठी मारायला (३०-४० चा सुमार, गुजरातमधल्या खेड्यात!) खाली उतरून येते. ती तशी धावत त्याच्याकडे जात असतांना दिग्दर्शकाला स्लो मोशनमध्ये जाण्याची दुर्बुद्धी होते. आता ही नायिका, म्हणजे एकेकाळची मॉडेल ऐश्वर्या राय, मॉडेल्स कॅटवॉकवर जसे आपले हात झुलवत चालत येतात व परत जातात, तशी हात झुलवत येते (flaining her arms, हे रास्त वर्णन)! नायिकेला कशी धाव, त्यावेली हात कसे ठेव वगैरे सांगणे तर दूरच राहिले, पण तिने तिच्या पद्धतिने जे केले, ते स्लो-मो-मध्ये दाखवून परत अधोरेखित केले गेले!

तंत्रे उपलब्ध असली तरी ती जपून, काळजीपूर्वक वापरावी तर त्यांचा उपयोग, नाही तर ती माकडाच्या हाती दिलेल्या कोलितासारखी होतात. ह्या सगळ्या चित्रपटात मला कुठेही प्रामाणिकपणे काही सांगण्याचा प्रयत्न आढळला नाही.आपण करत असलेल्या कलाकृतिबदद्दल जर आवश्यक ती किमान आत्मियता नसेल तर काय होते त्याचा हा चित्रपट म्हणजे उत्तम नमुना होय. आणि हे असे मणिरत्नम महाशय जर अलिकडचे यशस्वी होतकरू वगैरे दिग्दर्शक असतील, तर त्या इंडस्ट्रीकडून काय चांगल्या कामाची अपेक्षा करणार?