वुडहाऊस म्हणतो, दी टेंडन्सी टु ट्विस्ट दी नाईफ इन दी वुंड इज युनिव्हर्सल. म्हणून त्रास जरी होत असला तरी तुमचा त्रास टळावा म्हणून लिहितो.
तर बुद्धदेव गुप्ता नावाचा चौसष्ट वर्षांचा एक म्हातारा. त्याचे लंडनमध्ये एक हॉटेल आहे (की तो तिथे फक्त शेफ आहे? पहा इथे दिग्दर्शकाची प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला आवाहन करण्याची पहिली युक्ती!). त्याच्या आयुष्यात चौतीस वर्षांची एक तरुणी (बाई?) येते. मग ते लग्न करायचे ठरवतात. भारतात रहाणारा तिचा बाप त्याला विरोध करतो, मग भारतात येऊन बुद्धा तो विरोध मोडून काढतो... बाप रे, खरंच त्रास होतोय हो!
एवढे पुरेसे नाही म्हणून की काय तर या चित्रपटाला एका ब्लड कॅन्सर झालेल्या लहान मुलीचे उपकथानक आहे. तिचे नाव म्हणे सेक्सी. (आला रे आला, हिंदी चित्रपट वयात आला!) मग ती बुद्धाशी अकारण 'नादिरा' टोनमध्ये बोलते, त्याला प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटाच्या डीव्हीडीज आणायला सांगते( परत एकदा 'आला रे आला..') आणि शेवटी 'बायकांच्या आड्ययन्सला' रडायला पाहिजे म्हणून मरते.
मग काहीतरी वेगळे म्हणून या चित्रपटात काही थेट लैंगिक उल्लेख आहेत, या म्हाताऱ्याने औषधांच्या दुकानात जाऊन कंडोम मागण्याचा शेंडाबुडखा नसलेला प्रसंग आहे ( परत एकदा...), अमिताभ बच्चन आहे, काहीही आहे...
शेवटी काय, 'बेंबट्या, या जगात गाढवांस तोटा नाही, कुंभार हो!'