मूळ प्रश्न जास्तीत जास्त लोकांनी मराठी बोलले पाहिजे हा नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना आर्थिक फायद्याची आमिषे दाखवून त्यांना मराठीतून व्यवहार करण्यास उद्युक्त करणे ह्याने मूळ प्रश्न किंचितही सुटणार नाही.
मूळ प्रश्न मराठी माणसे आपली स्वतःची भाषा व संस्कृती किती जपतात हा आहे. तसे करण्यासाठी भय्याशी मराठीतून बोलण्याची जरुरी नाही. पण आपापसात बोलताना, लिहिताना आपण मराठी वापरणार की नाही? 'एलिझाबेथ साडी पहेनून सात फेरे घालणार आहे' हे मराठी वृत्तपत्रात लिहून आलेले वाक्य वाचल्यावर , 'आता ह्यात काय चुकीचे आहे बुवा? ही तर आमची (प्रवाहपतित) मराठीच आहे, असे मानून सहजपणे आपण पुढे जात राहणार का? तसे असेल, तर देवही त्या प्रवाहपतित मराठीचे संरक्षण करणार नाही. अर्थात त्यापासून ज्यांचे काहीही बिघडणार नाही, त्या सरपटणाऱ्यांबद्दल काय बोलणार?
मी अनुभवलेले काही येथे सांगतो. आमच्या ओळखीची एक हुशार ८-१० वर्षांची मुंबईत राहणारी मुलगी, एका वर्षी भेट झाली तेव्हा चमत्कारिक मराठीतून आमच्याशी बोलू लागली. आजी-आजोबा घरात मराठी बोलणारे, आजूबाजूचा सर्व शेजार-पाजार उच्च मध्यमवर्गीय मराठी, मग हे असे एकाएकी काय झाले? मग हळूहळू लक्षात येऊ लागले. मुलगी 'लहानपणापासूनच हुशार' अशी प्रतिमा असलेली. तिची आई काँव्हेंट शिक्षित, व ही पण काँव्हेंटमध्ये शिकणारी. मराठी शिकणे अगदी नाईलाज म्हणून केले पाहिजे, अशी समजूत झालेली. तेव्हा ती उगाच वाईट मराठी बोलू लागली होती, व तसे केल्याने 'बघा आमच्या शिल्पाला आता मराठीसुद्धा बोलता येत नाही धड' ह्याचे कौतुकच होऊ लागले होते. आता हे परदेशस्थ नातेवाईकपण असेच कौतुक करतील, अशी तिची साहजिकच अपेक्षा असणार. आम्ही तिचा ह्या बाबतीत थोडा विरस केला. 'पोहा खाल्ला' नव्हे, आपण 'पोहे खाल्ले' असे म्हणतो; 'वारा आली' असे न म्हणता 'वारा आला' असे म्हणतो, हे शांतपणे सांगितले. ती भानावर आली, व तेव्हापासून निदान आमच्यासमोरतरी ती असे वाईट मराठी बोलत नाही.
आम्ही रहात असलेल्या देशात अलीकडे एक मराठी स्त्री थोड्याशा रागाने, पण बऱ्याचशा कौतुकाने सांगत होती की 'माझ्या आशुतोशला इंडियन म्हटलेले आवडत नाही. मी 'इंडियन नाही', तो लगेच त्याच्या मित्रांना सांगतो!' आशुतोशला इथे येऊन दोन वर्षेसुद्धा झालेली नाहीत. पण घरी जर हे असे कौतुकच असेल, तर काय होणार?
आमचा मुलगा इथे आला तेव्हा ८ वर्षांचा होता. शाळेत सर्वच इंग्लिशमधून, मित्र, शिक्षकपण सर्वच गोरे अथवा चिनी. तेव्हा साहजिकच त्याची विचार करण्याची भाषा इंग्लिश झाली. अर्थात आम्ही घरी मराठीच बोलतो, त्यामुळे त्याची मराठीपासून नाळ तुटली नाही. पण इंग्लिशमधून विचार करून मराठीत बोलल्याने काहीवेळा चुकीचे मराठी बोलले जाते. उदा. 'तो मला बसवर भेटला ( He met me on the bus चे भाषांतर)'. अशा वेळी आम्ही हळूच त्याला सुधारत राहिलो. जर त्याच्या अशा बोलण्याचे कौतुक केले असते तर आतापर्यंत त्याने मराठीशी उरलासुरला संबंध तोडला असता.
तेव्हा. आपापल्या मगदुमाप्रमाणे व परिस्थिप्रमाणे जेव्हढे करता येईल, तेव्हढे करावे. भाषा तुपातली नको, पण उगाच हिंदाळलेलीही नको.