पण मणिरत्नम ला नवशिक्या म्हणण्याइतके किंवा मणिरत्नम माहितच नसण्याइतके इग्नोरंट असायचे असेल तर एकुणातच चित्रपटांवर अधिकारवाणीने बोलूही नये हो!
आयुष्यात मी बरेच युरोपियन, काही जपानी. काही चिनी, एखाद दुसरा रशियन व बरेच भारतीयही चांगले चित्रपट बघितले आहेत. अगदी जुन्या व क्लासिक समजले जातात त्या बॅटलशिप पोटेम्किन, दी सिकाचा बायसिकल थीफ, कॉस्टा गावरासचे काही चित्रपट, मायकेलएंगलो अंटोनिओनीचा 'द पॅसेंजर', बुनेल, अकिरा कुरोसावा, ओझू पासून अलिकडेपर्यंतच्या, त्चांग यिमौचे 'रेस द रेड लँटर्न', 'रेड सोर्घम', तिआं त्चूआंत्चूआंचा 'ब्लू काईट' हे बिगर भारतीय, तसेच आपलेच श्याम बेनेगल, गुरु दत्त, अपर्णा सेन , गिरीश कासारवल्ली ह्यांचे सुंदर चित्रपट. फासबिंदर कळला नाही! ह्या साऱ्यांच्या तुलनेत मणिरत्नम कुठे राहतो? माझ्या पेशाच्या निमित्तने, सुदैवाने मला भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या काही चांगल्या मंडळींचा सहवास लाभला. अरुण खोपकर, केतन मेहता हे त्यातली दोन ठळक नावे. त्यांच्याबरोबर राहूनही थोडेकाही शिकता आले.
मला काय म्हणायचे होते, ते मी जरा परत विशद करतो. क्राफ़्ट वेगळी व पॅशन वेगळे. गुरु दत्तचे चित्रपट बघा. त्यात क्राफ्ट आहेच, पण त्याहीपेक्षा विषयाबद्दल खोल पॅशन आहे. नुसता प्यासा घ्या. त्यातली सिनेमाटोग्रफी त्या विषायाला अनुरूप आहे. त्यात क्राफ्ट आहे, ती सुंदर लो अँगल शॉटस, त्यातल्या लायटिंगमध्ये, कॅमेराच्या फिरवण्यावर (मूवमेंटस्). पण हे इतकेच नाहे, तर त्याच्यात त्याच्या पलिकडेही बरेच काही ठोस आहे. घटनांचा क्रम बघा, त्यातील अब्रार अल्वीचे संवाद, चुरचुरीत, पण एक शब्दही व्यर्थ नाही! खऱ्या अर्थाने संयत म्हणजे काय हे सांगायचे झाले तर प्यासा एक उत्तम उदारहण आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, 'आज सजन मोहे अंग लगालो'चे चित्रिकरण पहा! प्यासामधे एक फ्रेम कापता येत नाही, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे, कामाच्या निमित्ताने--- ती झटापट एक तरूण दिग्दर्शक करत होता, दोन दिवस, शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिला. प्यासाबद्दलच मी एक वेगळा निबंध लिहू शकेन.
मी जी गुरुमधली एक-दोन उदाहरणे सांगितली, त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? (जाता जाता, त्यातला तो जो एक दोघांच्या मधून (समोरासमोर उभे असताना!) ट्राम जाते हा सीन आहे, तो तर सरळसरळ प्यासामधल्या एका सीनवर बेतलेला आहे. पण प्यासाचा तोच सीन आपल्याला आत जाऊन भिडतो, तो त्याच्यातल्या प्रामाणिकपणामुळे. इथे निदान मलातरी हा सीन तद्दन तकलादू क्राफ्टी वाटला).
मी हा चित्रपट (अधून मधून, त्यात काही मी मिस केले नाही!) बघायच्या अगोदर मला मणिरत्नामबद्दल काहीही बरेवाईट मत नव्हते.चित्रपट बघून जे काही वाटले, ते मी तसे लिहिले. आता आपल्याल गुरुदत्तबद्दल काहीही माहित नसेल, तर नुसते IMDBवद जाऊन काही माहिती मिळणार नाही. आपण जे बघाल व अनुभवाल ते खरे.
इंडस्ट्रीकडून चांगल्या कामाची अपेक्षा इत्यादी म्हणताना प्रेक्षक म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे हे विसरू नये. तुम्ही चार सिनेमे नाकारताय पण लोक त्याच सिनेमांसाठी वेडे झालेत ना. मग निर्माते तेवढेच करणार.
ह्याचा अर्थ मला बिलकूल कळला नाही. धंद्याची मागणी आहे, म्हणून तसे आम्ही करतो, तर हरकत नाही. पण मग हा दिग्दर्शक सिनेमाच्या संदर्भात कसा काय मोठा ठरतो, बुवा? तसे असेल तर मनमोहन देसाईपण मोठा (यशस्वी, नक्कीच) दिग्दर्शक ठरतो, इतर बरेच चोप्रा, सिप्पी हेही ठरतात! ह्या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत. अगादी धंदेवाईक चित्रपट देणाऱ्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. आणि खरोखरीच मनमोहन देसाईचा 'धरमवीर' मी चारदा थिएटरात जावून बघितला होता, डोके घरी ठेवून, मजा आला! पण आपण काहीतरी वेगळे देत आहोत असे दाखवायचे व नुसते तकलादू , क्राफ्टी द्यायचे, ह्याला माझा आक्षेप आहे. मणीरत्नमचे इतर काहीही मी बघितले नव्हते, रोझा लागला त्याच सुमारास मी देशांतर केले, पुढे चित्रपट बघण्याचा फारसा उत्साह राहिला नाही. त्यामुळे त्याचे इतर काहीही बघितले नाही. पण त्याचे 'काहीतरी वेगळे देतो' अशा अर्थाने नाव खूप झाले आहे, हे माहिती आहे. 'इंडस्ट्रीकडून अपेक्षा...' हा माझ्या प्रतिसादातला भाग ह्या संदर्भात होता.