बरेवाईट प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. लेखाला 'इंग्रजी शब्दांचे लफडे' या चर्चेचा संदर्भ आहे, हे उघड आहे. अर्थात हा संदर्भ टाळूनही या लेखाकडे एक विनोदी लेख - चांगला वाईट कसाही- म्हणून पहाता येईल. लेखातल्या त्रुटी दाखवणाऱ्यांनी विनोद हा 'टवाळा आवडे' असाच असल्याचे गृहीत धरले आहे. इंग्रजी भाषेपासून मराठीचे रक्षण करण्याचा कैवार घेतल्याच्या आविर्भावात उभे ठाकलेल्या तथाकथित संस्कृतीसंरक्षकांना हे लिखाण बुडत चाललेल्या मराठीला आणखी एक धक्का देण्याचा प्रयत्न वाटेल, किंबहुना वाटलेले दिसतेच आहे! पण दुसरीकडे हेच संस्कृतीसंरक्षक आपली मराठी अशी अनेक आक्रमणे पचवून आजही दिमाखात उभी आहे याचे गौरवगानही करताहेत! आणि लेख ठरवून टिंगल केल्यासारखा आहेच. विसंगती, उपहास, वक्रोक्ती, अतिशयोक्ती आणि अपेक्षाभंग यातूनच विनोदनिर्मिती होत असते. यात निखळ काय हे कसे आणि कुणी ठरवायचे? 'छबकड्या' हा शब्द लेखकाला (आणि मलाही) अत्यंत निष्पाप वाटला, तर इतरांना तो अगदी क्रूर आणि जहरी टीका करण्याइतपत आक्षेपार्ह वाटला!
या संकेतस्थळावर 'जित्याची खोड' म्हणून मराठीचा आग्रह धरत रहाणे, मग इथली मराठी आणि बाहेरची मराठी यात कितीही जमीनअस्मानाचा फरक असो, हे मला दुटप्पीपणाचे वाटते. संकेतस्थळ हे जनमानसाचे प्रतिबिंब असावे. इथे येताना शुचिर्भूत होऊन या, मग बाहेर तुम्ही महिन्यातून किती वेळा अंघोळ करता हे आम्ही विचारणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. जे बाहेर करणे अवघड आहे ते इथे करा अशी भूमिका संकेतस्थळाच्या मराठी बांधिलकीशी विसंगत आहे, असे मला वाटते.
इंग्रजी शब्दांबाबतचा टाहो आणि गळाला लागलेले मनोगती ही भाषा आक्षेपार्ह आहे. काही भाबड्या समजुतींचे काष्टे ढिले झाले आणि चार लोक हसूबिसू लागले की 'संस्कृती बुडाली हो..' म्हणून कपाळावर भस्म फासून सुतकी आठ्या घालणाऱ्यांना थिल्लरपणा आणि विसंगती यातला फरक कळत नसतो हेच खरे. पण जाताजाता असे 'मनोगतीं' च्या बुद्ध्यांकाला किरकोळीत काढू नये.
शेवटी विनोद हा नेहमी दुसऱ्यावर केला जावा अशी अपेक्षा असते. त्यातले एखादे कुस आपल्याला येऊन बोचले की मग तो दर्जाहीन, उथळ, कृत्रीम आणि 'अपेक्षित नसलेला' होतो. गंभीर विषयावरची चर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवरचे विनोदी लेखन यात फरक करण्याची विनोदबुद्धी म्हणावी तशी विकसित झालेली नाही याचे नवल आणि वैषम्य वाटते.