रावसाहेब,

आपल्याकडे विनोदबुद्धी आहे, आपण सकस विनोद निर्मिती करू शकता, आपल्या लेखनाला काही दर्जा आहे या जाणीवेतून मला आपला हा लेख आपल्या दर्जाचा न वाटता कमी प्रतिचा वाटला, आपला सूर आपल्याच भाषेची टिंगल करणारा वाटला. आपल्याला मराठी शब्द वापरायचे नसतील तर किमान इतराना तसे करण्यापासून परावृत्त करणारे लेखन हे निखळ विनोदी न वाटता राजकिय प्रचारकी थाटाचे आणि उपहास, वक्रोक्ति वगरेचा वापर करून विरोधकांना नामोहरम करणारे वाटले. मी, मा. द्वारकानाथ, मा. कुशाग्र हे मराठीचा आग्रह धरतो म्हणून जर आपल्याला विरोधक वाटत असतील, तर आम्हाला झोडणारा लेख लिहिण्यात आपण निश्चितच यशस्वी झाला आहात, त्याला अनेकांप्रमाणे मीही दाद देतो.

<या संकेतस्थळावर 'जित्याची खोड' म्हणून मराठीचा आग्रह धरत रहाणे, मग इथली मराठी आणि बाहेरची मराठी यात कितीही जमीनअस्मानाचा फरक असो, हे मला दुटप्पीपणाचे वाटते. संकेतस्थळ हे जनमानसाचे प्रतिबिंब असावे. इथे येताना शुचिर्भूत होऊन या, मग बाहेर तुम्ही महिन्यातून किती वेळा अंघोळ करता हे आम्ही विचारणार नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे. जे बाहेर करणे अवघड आहे ते इथे करा अशी भूमिका संकेतस्थळाच्या मराठी बांधिलकीशी विसंगत आहे, असे मला वाटते.> रावसाहेब, रागावू नका. आपल्याला उपदेश करायचा मला अधिकार नाही, व तसा हेतूही नाही मात्र केवळ आपलेपणाने तसा आग्रह धरला, जर ही चूक असेल तर क्षमा करा. दुटप्पीपणा वगैरेचा प्रश्न नाही पण एखादी योजना - समजा पाण्याची बचत - तर प्रथम आपण घरच्यांना तसे करायला सांगतो. जर मराठीचा आग्रह धरायचा, अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर टाळायचे आवाहन करायचे असे वाटले (तो माझा मूर्खपणाही असू शकतो) तर मी स्वाभाविकत: माझ्या मनोगतींना आपुलकीने सांगू इच्छीतो, एक मनोगती या नात्याने असलेल्या आपुलकीने. इतर संकेतस्थळावर वा बाहेरच्या जगावर - ज्यांना मराठीचे सोयर-सुतक असेलच असे नाही त्यांना मी कशाला काय सांगू? अर्थात तेही मराठीचा पुरस्कार करू लागले तर आनंदच आहे. शुचिर्भुततेचेही तसेच आहे. अंघोळ करायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याची उठाठेव आपण कशाला करावी? पण जर देवळाच्या गाभाऱ्यात जाउन देवाचे दर्शन घ्यायची इच्छा असेल, तर आत येताना शुचिर्भूत होवून येण्याचा आग्रह देवळातले लोक धरू शकतात. तात्पर्य आपण जगाला सांगू शकत नाही, मग निदान ज्यांना सांगणे शक्य आहे, स्वाभाविक आहे आणि जे आपल्याला आपले वाटतात त्यांना सांगून सुरूवात का करू नये? मराठीचा आग्रह साऱ्या जगाला करणे शक्य नाही, पण सुरुवात मराठी मनोगतापासून का करू नये? यात दुराग्रह वा अट्टाहास नाही तर कळकळ आहे. अनेकदा नकळत मराठी माणूस आपल्या भाषेत इतर शब्द वापरतो, पण जर त्या शब्दांसाठी मराठी शब्द आहेत, ते सहज-सोपे व चांगले आहेत असे समजले तर तीच माणसे आनंदाने मराठी शब्द वापरू शकतात या भावनेतून हा आग्रह आहे. ज्यांना आपल्या भावना व्यक्त करायला मराठी तोकडी पडते असे वाटते वा ज्यांना इंग्रजी भाषा मराठीहून अधिक संपन्न वाटते व म्हणून जे जाणीवपूर्वक इंग्रजीचा वापर करू इच्छीतात त्यांना परावृत्त करण्याचा निदान माझा तरी हेतू नाही. अखेर भाषा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

<गंभीर विषयावरची चर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवरचे विनोदी लेखन यात फरक करण्याची विनोदबुद्धी म्हणावी तशी विकसित झालेली नाही याचे नवल आणि वैषम्य वाटते.>

हे बाकी लाख बोललात. पण चालायचेच! सगळेच काही प्रगल्भ बुद्धीचे नसतात, माझ्या सारखा सुमार कुवतीचा एखादा असू शकतो. वैषम्य नका वाटून घेउ, तो काही आपला दोष नाही. वर्गात काही मुले ढ असतात पण त्याला शिक्षक काय करणार? सगळे सारखे नसतात, काही अधिक तर काही उणे.