शेवटी विनोद हा नेहमी दुसऱ्यावर केला जावा अशी अपेक्षा असते.
काही कारण नाही. तसे असलेच पाहिजे असा नियम नाही.
त्यातले एखादे कुस आपल्याला येऊन बोचले की मग तो दर्जाहीन, उथळ, कृत्रीम आणि 'अपेक्षित नसलेला' होतो. गंभीर विषयावरची चर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवरचे विनोदी लेखन यात फरक करण्याची विनोदबुद्धी म्हणावी तशी विकसित झालेली नाही याचे नवल आणि वैषम्य वाटते.
हे काही अंशी खरे आहे. तसे नसावे हे सुद्धा पटते.
जे बाहेर करणे अवघड आहे ते इथे करा अशी भूमिका संकेतस्थळाच्या मराठी बांधिलकीशी विसंगत आहे, असे मला वाटते. >>
पुढील प्रतिसाद हा सर्व आपल्याला एकट्याला उद्देशून आहे असा गैरसमजही करू नका. आपण जशी आपली भूमिका मांडली तसेच हे आमच्या बाजूने समजा.
>>असे आपल्याला वाटते याचे कारण आपण मराठीने प्रवाही राहावे म्हणजे नक्की कसे राहावे याबद्दल आपला एक पूर्वग्रह केला आहे.
आम्हाला वाटते की सोपे मराठी प्रतिशब्द सापडायला हरकत नाही, काही इंग्रजी शब्द मराठमोळे करायला हरकत नाही, दरवेळी सस्कृतचा आग्रह असावा असेही नाही.
इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा आहेत. मान्य ना? मग इंग्रजी साहेबाच्या व्याकरणाचे नियम सांभाळूनच अथवा त्याने सांगितली तशीच का बरे बोलावी?लिहावी? उद्या इंग्रजी शब्द आठवला नाही, छे, योग्य वाटला नाही , कानाला खटकला, चारजणांना समजला नाही अशी कारणे देत सर्वांनी त्यांना पटेल योग्य वाटेल अशा भाषातील प्रतिशब्द जर वापरला तर काय होईल? एक उदाहरण बघा "आय थिंक संजोपराव, यू आर खूप दूर फ्रॉम बींग राईट" ,अशा प्रकारची इतर भाषा मिश्रित इंग्रजी वारंवार, मोठ्या गटाने, लोक बोलू लागले तर जगभर तसा प्रघात पडेल का? पडला आहे का?
आज जागतिकीकरणाने कित्येक देशातील लोक परदेशाची वारंवार वारी करतात, तिथे स्थायिक होतात. मग प्रवाही इंग्रजीवर मुसलमानांनी आपल्यावर केली ना त्याहून अधिक आक्रमणे व्हायला हवी होती, शब्दकोश बघितला, आज निर्माण होणारे इंग्रजी चित्रपट, मालिका आणि जगातील इंग्रजी वृत्तपत्रे बघितली तर तसे बदल तेवढ्या प्रमाणात झाले आहेत अथवा होत आहेत असे दिसत नाहीत. काही किरकोळ इतर भाषेतले शब्द वापरणे आणि ऊठसूठ याला योग्य मराठी शब्दच नाही अशी सबब पुढे करत इतर भाषेतील शब्दांनी काम भागविणे यात खूप अंतर आहे. इथेच कित्येकांचा गोंधळ उडालेला दिसतो.
मनोगतावर अंतर्नादचा उल्लेख जास्त वेळा नाही असे आपल्या जुन्या एका लेखात वाचले होते. का वाचता आपण अंतर्नाद? चार तथाकथित हुशार समजणारे वाचतात म्हणून की काय? राग मानू नये अथवा हे व्यक्तीगत सुद्धा समजू नये. हे प्रश्न विचारण्याचे कारण असे की जर आपल्याला अंतर्नाद आवडत असेल आणि प्रगल्भ वाचकाचा आरसा म्हणून त्याकडे आपण बघत असाल तर त्यांची मराठी विषयक भूमिका आणि मनोगताची भूमिका यात विशेष फरक आहे असे आम्हाला तरी वाटले नाही.
मराठीचा दुराग्रह म्हणणाऱ्यांनी स्वतःलाच विचारा पाहू -काय भूमिका आहे अंतर्नाद सारख्या मासिकांची? किती परभाषेतील शब्द त्यांचे लेखक वापरतांना दिसतात?
आजची मराठीमाध्यमे आणि लोकांचा कल बघितला तर त्या मासिकाच्या मालकाने दुकानाला कुलूप लावून पळ काढायला हवा होता. तसे झाले नाही..उलट देशात आणि देशाबाहेर मराठीप्रेमी वर्गणीदार वाढले आहेत. ही शहरातून होणारी नवी सुरुवात आहे. ग्रामीण भागातला वाचक तर फक्त मराठीची अपेक्षा करतो. कित्येक परप्रांतीय भाषातील पुस्तके मराठीत का अनुवादित होतात?आणि या अनुवादात मराठी शब्द असतात, इतर भाषेतील शब्दांचा भराणा नाही. उमा कुलकर्णी, शांता शेळके यांनी केलेले अनुवाद वाचावे. आम्हाला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल. जुन्या रशियन लोककथांची भाषांतरे सुद्धा पहावी. या सर्वांना जर मराठी शब्दांचे वावडे नव्हते तर मग आम्हालाच का असावे?
इंग्रजांच्या दृष्टीने आपला स्वातंत्र्यलढा बंड होते आणि आपल्याकरता क्रांती!
बस्स हाच फरक आपण, आपल्यासारखे कित्येक आणि काही (सध्या अल्पसंख्यांक) मराठीचा आग्रह धरणारे यात आहे. मराठीचा न्यूनगंड बाळगण्याचा काळ आता तरी संपायला हरकत नाही. दक्षिणेतील इंग्रजी शिकलेले लोक , त्यांना एकमेकांशी बोलतांना इंग्रजी शब्द वापरण्याची गरज दिसत नाही (आमचा तरी अनुभव) आपल्याएवढी तरी नक्की नाही. त्यां त्या भाषेतील चित्रपट बघा, किती इंग्रजी शब्द आढळतात? भाषा कळली नाही तरी इंग्रजी शब्द तर ओळखता येतील ना?असा प्रयोग शक्य असेल तर करून पहा. प्रयत्न करून बघा. कित्येक मराठी शब्द असतांनाही केवळ सवय, लोक काय म्हणतील अशा विचाराने आपण मराठी शब्दाला दूर करतो. अहो,सर्व माध्यमे लोकांकरता आहेत. तिथे लेखन करणारी माणसेच आहेत. ती बदलायला वेळ लागेल पण बदल अशक्यच आहे असे नाही. सध्या सुरुवात फक्त शब्दांपासून करायला हरकत नाही.
बघा, पटेल ते घ्या एवढेच म्हणता येईल.