विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)

हातापायांची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करत सभोवार पाहू लागले आणि प्रांत गोंधळून म्हणाला, "पंत तुम्हाला म्हणायचंय काय?"

"मग ऐका तर" पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले, "साहेब, माझा गाव दुष्काळाच्या छायेत असून लोक कुरडूचा पाला खात आहेत आणि साथीच्या रोगाने घरे बसत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळविले होते की नाही?"

पंतांच्या सरबत्तीने प्रांत चमकला. तो मटकन् खुर्चीवर बसला. "खरं आहे" तो पुटपुटला.

"मग उत्तर का दिले नाही?" पंत वेड्यासारखे ओरडले.

"उत्तर दिले नाही म्हणून लोकांनी अराजकता माजवावी, लुटालुट करावी हे आम्हाला मान्य नाही" प्रांत खेकसला.

पंत भाला भोसकल्याप्रमाणे बिथरून ओरडले, "मग काय मान्य आहे? लोकांनी कुत्र्याच्या मौतीने मरावे? साहेब, मलाही हे मान्य नाही."

"मग काय मान्य आहे?" प्रांत किंचाळला, "लुटालुट आणि बेबंदशाही?" त्याने चावडी डोक्यावर घेतली.

"ह्याला उत्तर होय!" पंत गंभीरपणे उद्गारले.

"ठीक आहे, करा लुटालुट, आम्ही आरोपींना घेऊन आताच सातार्‍याला जातो" प्रांत डोळे बारीक करून म्हणाला.

त्यावर पंत निर्भयपणे म्हणाले, "जा, खुशाल जा. पण लवकर परत या."

"का, कशाला?" प्रांत चमकून म्हणाला.

"मला, - विष्णुपंताला अटक करायला" पंतांनी उग्र आवाजात तंबी दिली.

"म्हणजे तुम्ही स्वत: लुटालुट करणार तर?" प्रांताने विचारले.

पंतांनी उपरण्याने कंबर बांधली. प्रांतावर करडी नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिले, "साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला एक तर कुत्र्याच्या मौतीने मरावे लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावे लागेल आणि मी कुत्र्या सारखा मरणारा माणूस नाही साहेब!"

(क्रमश:)