विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपंतांचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्क्या बसल्याप्रमाणे बसून तो नरमून म्हणाला, "मग आम्ही काय करावे म्हणता?"

"तुम्ही सरकार आहात." पंत ठासून म्हणाले, "हा दुष्काळ निवारा. साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढा."

विष्णुपंत बोलत होते, लोक ऐकत होते, प्रांत ऐकत होता. सर्वत्र शांतता निर्माण झाली. पंत क्षणभर थांबले. प्रांत काहीच बोलेना.

तो निरुत्तर झाल्याचे लक्षात येताच पंतानी बजावले, "साहेब, हे लोक मढी नाहीत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार त्यांच्यावर काबू करू शकत नाही."

एकाएकी प्रांत चटकन् उठला. त्याच्या रागीट चेहर्‍यावर हास्य तळपले. त्याने पंतांचा हात हातात धरून म्हटले, "आम्ही तुमचे वय आणि दर्जा लक्षात घेतले नाही म्हणून राग मानू नका. आम्ही दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू."

विष्णुपंत शांत झाले. त्यांनी मुरावर नजर फेकली. मुराच्या सुटकेचा हुकुम प्रांतसाहेबांच्या मुखातून पोलिसांच्या कानात शिरला. मुराची बेडी निखळली. लोकांनी नि:श्वास टाकला. सर्व नजरा पंतांवर स्थिर झाल्या.

तो काळ गेला, तो दुष्काळ गेला, ते विष्णुपंतही गेले. पण विष्णुपंतांचे शब्द अजूनही लोक विसरले नाहीत. कोणीही विसरू नयेत इतके खोल माणसांच्या हृदयांत ते घर करून बसले आहेत. कधी कधी ते कानात गुणगुणू लागतात

- "तुम्ही जगलंच पाहिजे!".

(समाप्त)