ह्यासोबत
मी आणखीन थोडी पावले पुढे टाकली.. जिथे उभी होते तेथेच आमचे अंगण होते.. मी इथेच माझ्या बालपणीतील भातकुलीचे डाव मांडलेले होते, याच अंगणाच्या मध्यभागी तुळशीवृंदावन होते, भराभर सगळी चित्रे डोळ्या समोर फेर धरून तरळत होती आणि तेव्हड्यात सरकण या सगळ्या आठवणींनी डोळ्यात पाणी दाटले अन टचकन डोळ्यात पाण्याच साम्राज्य वाढलं.
"ए टिंग्या, तुझी आत्या तर लय डेंजर दिसतीया " .. मन्या.
का रं ?
अर्रर्र माय म्हणती इथं भूत हाय, वाड्याकड अजिबात जायचं नाय, मला तर जाम भीती वाटतीया, मी तर जातू बाबा इथनं तूच रा आत्यासोबतस्नी..
"ए मन्या अरं थांब की का पळतोयास, अस नाय काय , जाऊदे मीच थांबतू इथं .." टिंग्या
मनात मागच्या आठवणी फडफडत असतानाच, समोर अर्धवट पडलेली ती खोली दिसली.. बाबांची, त्या भिंतीतली ती देवरी अजून तशीच होती, आता तिथं चिमणीनं वास्तव्य केल्या सारखं दिसत होत. ती खोली पाहिली अन मनात धस्स झालं .. सगळ्या आठवणींनी माझं चित्त बेभान झालं, मनात भय दाटून ओठांची थरथर अन हृद्याची कंपने वाढली अन हळूच डोळ्यातून संतधार गालावर ओघळली.
टिंग्या, तांब्या भरून पाणी आण रे आबांना .. मी टिंग्याला पटकन बोलले.
पोरी अस का बोलतीया.. अजून आबा पाटील जीता हाय, कवा बी बिनधास्त घरच्यापरी येत जा की .. अस परकं का समजतीयास आम्हास्नी.
अहो नाही आबा, तसं नाही. एव्हड्यात टिंग्यान पाणी आणून आबांना दिले.
सकाळीच आले बघा आबा, वाडी ओळखू पण येईना लवकर ..
रामा, ए रामा ऽऽ कौसल्या वहिनी रामा हाय काय घरात ? मी बाहेरणच आरोळी ठोकत आलो होतू येथं
हाईत की मागं, बसा त्या खाटल्यावर, बोलावती ह्यास्नी.. कौसल्या वहिनी.
तेव्हड्यात रामा, आपलं पांढरं फटाक धोतर सावरत पुढं आला ..
काय र आबा ? सकाळच्या पारी आज.. काय भानगड हाय ..?
इतक्यात सारी जमीन हादरली.. धाडधूडऽऽ सगळीकडे आवाज आलं, काय कळायच्या आत आजूबाजूच्या भिताडावरची दगडं धडाधड पडू लागली, आतनं वाहिनीच्या किंकाळण्याचा आवाज आला.. तसा रामा आत धावला, किंकाळण्याच्या.. ओरडण्याचा आवाजानं सगळं चक्रावून गेलं, शेजारची माळवदाची घर तर पत्त्यांवाणी पडली..
आतनं रामाचा आवाज आला.. आबाऽऽ आबाऽऽ, मी आत धावलू.. वाहिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याल्या, रामाचं डोकं फुटलेलं, म्या पुढं धावलू .. इतक्यात काय कळायच्या आत सरकणी शेजारच भिताड आमच्या अंगावर ढासळलं अन म्या बी त्या खाली गाडला गेलो. मला सुध आली तवा, सगळीकडं डाक्टरच डाक्टर .. अन कोकलणारी पोरं, रडणारी माणसं अन धाय मोकलून ओरडणाऱ्या बायका .. कोणाचा हात तुटलेला, कोणाचं पाय.. कोणाची माय तर कोणाचा बा मरून पडलेला ..सगळी वाडीच उध्वस्त झाल्याली ..
त्याच काळ्या दिशी सगळं संपलं पोरी, तुझा बा..कौसल्या वहिनी..माझी पोर, रुक्मिणी समदं समदं संपलं.
याच डोळ्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसं अन सरणावर जाणारं वाडीच्या अस्तित्वाची निशानं पाहिल्यात. अन काय सांगू या सगळ्या यातनांनी.. जखमांनी सगळं खाक केलया अन पाह्यलेल्या सगळ्या सप्नाची, आशेची राख घेऊन हिंडतोय हा आबा बाकी काय नाय.
बसा हा आबा इथं, युवराज पाणी दे रे एक तांब्या भरून.. मी आबांना बसवत म्हणाले
जाऊद्या आबा, काय करणार आता अन कोणास दोष द्यायचा आपण, " दोष ना डोळ्यांच्या दृष्टीचा आहे ना सभोवतालच्या विस्कटलेल्या या सृष्टीचा, उगाच आपल्याच अस्तित्वास विसरून आपण समजुतीच्या थेंबानं मनास भिजवत असतो ."
बरोबर हाय पोरी तुझं, पण आता दुसरं करणार तरी काय आपण, "आवेशाची रेघ कवाच पुसट झालीया, अन आशेच्या.. सप्नांच्या ओझ्याखाली उमेदेची पार होळी झालीया." आबा हताश पणे बोलले.
आबा मंदिराचा जीर्णोद्धार झाला की नाही अजून मग..? मी आबांना थांबवत मध्येच बोलले.
"कसलं घेऊन बसलियास पोरी.. आता तर अजूनच अवकळा आलीया त्यास. भूकंपानं सार अवसानच गेलया बघ, मंदिराचच काय लोकास्नी घर बी नाय नीट राहायला, अन जे काय चार भिताड उभी दिसतायेत ती बी कसली घर हाईतं .. कर्त्या सवरत्यांचा आधार नसल्यानं थडगी हाईत थडगी.." अस म्हणत आबा पुन्हा गप्प बसले.
आबा, चला ना नाथाच्या मंदिरात जाऊया आता, चालेल का ? मी थोड्यावेळाने आबांना विचारले.
चल पोरी, काठी कुठाय माझी.. ?
हे घ्या आबा, अस म्हणत मी आबांना हाताला धरून उठवले.
बोलत बोलत मी आणि आबा देवळाच्या दिशेने जाऊ लागलो, माझं लक्ष आता आबांकडे नव्हतेच,
माती आणि मुरमाच्या रस्त्यावर चालताना बाभळीची झाडे मध्ये मध्ये लागत होती, बकरी, मेंढ्या माळरानावर हिरव्या पाल्याच्या शोधात फिरताना दिसत होती, मी मात्र तशीच पुढे चालत होती, नकळतच मध्ये थांबत माझ्याच मनाशी बोलत होती, मध्येच पाऊलवाट अडली की तिथे हि मी क्षणभर भुलत होती.
समोर आता मंदिर दिसत होते, याच मंदिरात मी लहानपणी दर रविवारी येत असत, नाथाची भव्य मूर्ती आणि चिरेबंदी तटबंदी असलेल्या ह्या मंदिराने मन अगदी भरून यायचं. आता तटबंदी ढासळलेली अन मंदिर बळेच भिंती उभ्या केल्या सारखे वाटत होते.
मी आबांना मंदिराच्या आत जाताना विचारले , मंदिरा साठी देणगी कुठे देतात आबा ?
अग हि काय इथंच..मंदिराच्या पुजारीबुवाकडं, तेच पाहत्याती सारं आम्ही काय फकुस्त जत्रला पैका गोळा करया असतू.पण आधी दर्शन तर घे की नाथाच मग बोलूया. अस म्हणत आबा गाभाऱ्यात गेले. मी इकडे तिकडे नजर फिरवत शेजारच्या भितींवरील देवांच्या चित्रांकडे बघत आबांच्या मागे गाभाऱ्या मध्ये गेले. दर्शन घेऊन झाल्यावर मी पुजारीबुवांच्या पाया पडले.
पुजारी बुवा वळखली का हिला ? .. आबा .
देव सुखा समाधानात ठेवो कायम .. असा आशीर्वाद देत पुजारीबुवा म्हणाले, नाय बा! पण चेहरा ओळखीचा वाटतुया.. कोण बरं ..
पुजारी बुवा, मी राधा.. रामा देशमुखांची मुलगी.
अरे वा वा . कवा अलीस पोरी वाडीला, अन नाथाला आली ते झ्याक झालं बघ.
पुजारीबुवा ते नंतर बोला, आधी पुस्तक आणा देणगीच, पावती फाडाया. आबा पटकण बोलले.पोरी कितीची पावती फाडणार हाय ? म्या म्हंतू १००० रुपयाची फाड, इथं भिंतीवर नाव लिवलं जाईल तुझं, अन शिखराच काम रेंगाळलय ते बी पुरं करता येईल मग. आबा आनंदाने बोलले.
आबा नावाचे काय करायचंय मला, जत्रा कधी आहे आपल्या वाडीची ?
आता बघ पोरी, चार महिन्यानं बरोबर आष्टमी हाय, तवाच ४ दीस हाय जत्रा.
हा मुली, कितीची पावती फाडू मग, फाडू का १००० रुपयाची ? .. पुजारीबुवांनी पेन पावतीवरती ठेवत विचारले .
आबा, जीर्णोद्धार करण्यास सगळे किती रुपये लागतील ?
अस एकल्या बरोबर पुजारी बुवा माझ्या तोंडाकडे बघतच राहिले.आणि आबांच्या डोल्यात तीच जुनी चमक दिसत होती कदाचित, अन एक स्वप्न पूर्णं होण्याची एक झलक हलकेच दिसत होती. पोरी .. एव्हडाच भावनावश आवाज त्यांच्या तोंडून आला.
राहूद्या आबा, अन तसे माझ्या बाबांबरोबर तुम्ही शेवटचे मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दलच बोलला होता, तेंव्हा त्यांची पण अशीच इच्छा होती अस समजून.. माझे वाक्य मध्येच तोडत आबा बोलले, पोरी या वाडीवर खूप मोठे उपकार होतील बघ तुझं..
आबा, काय बोलता आहात, ही वाडी माझी पण आहे ना ? अशे बोलत मी पुजारीबुवांकडे पाहिले.
७०-७५ हजार लागतील पोरी. पुजारी बुवांनी सांगितले.
ठीक आहे, ८० हजाराची पावती फाडा मग, जत्रे पर्यंत पूर्णं होईल ना काम सगळे.. ?
होईल ना काय पुसते पोरी, झालंच समज .. आबा उत्साहानं बोलले..
...
आबाऽ फडके मास्तर कसे आहेत.. त्यांची मात्र बरीच आठवण येते मला.
अग चल की आता, शाळंकडच जाऊ आपण.. मास्तर म्हंजी या वाडीला लाभलेला देव माणूस हाय देव माणूस.काय काय नाय केलं त्यानी या वाडीसाठी.. आबा बोलतच होते, मी मात्र पुन्हा त्या बालपणाच्या, शाळेच्या आठवणीत गुंतून जायला लागले, अन माझे पाय आबांसोबत शाळेकडे वळाले....
क्रमशः