हा डाव जिंदगी, लाव ठरले माझे,
कैफात खेळी या, श्वास रुळले माझे.
ती नाही भीती, पराभवाची आता,
"घबाडा"चे सारे, अंक कळले माझे.
जी येथे तुमची, वाट लावते वाट,
पण रस्ते अलगद, तेही वळले माझे.
हा रंग कोणता, कोणाचा कुंचला,
ते दुःखही काळे, असे पळले माझे.
असला धुराळा, सुरासुरांचा येथे,
तरी मानवतेचे, बीज फळले माझे.
हे शक्ती-चांदणे, मुक्तीचे आगार,
ते चंद्रही कोरे, नाही मळले माझे.
धगधगती ज्योती, प्रेमाची ह्या हाती,
मज नसे ही पर्वा, काय जळले माझे.
जगताना हे मी, जीव कुठे सांडला,
ते तुमच्यासाठी, मोती गळले माझे............
प्रज्ञा महाजन