॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी ४

॥ एकात्मता स्तोत्र ॥ भाग ४ पैकी ४

झाले किती खचित होतीलही अनेक । राष्ट्रा समर्थ करण्या झटले कृतार्थ ॥
त्यांच्या स्मृतीस स्मर तू सदा मनात । तू संघ संघ जप मंत्र निजांतरात ॥

दण्डकारण्यात वैदिक संस्कृतीची ध्वजा फडकवल्यावर सप्तसिंधूंपलीकडे जावा सुमात्रादी द्विपांवर सम्यक संचार करणारे महर्षी अगस्ती, प्रागैतिहासिक काळात कंबोडिया सारख्या प्रदेशावर अधिकार करून तेथील सर्वतोमुखी विकास केल्यामुळे त्या देशास स्वतःचे नाव देणारा राजा कंबू, आग्नेय आशियात फुनान साम्राज्य स्थापणारा भारतीय कौण्डिण्य, मलाया द्विपापर्यंत साम्राज्यविस्तार करणारा चौल राजेंद्र, पराक्रमाने कलिंगविजय मिळवणारा अन् त्यातील नरसंहाराने व्यथित होऊन बौद्ध धर्म स्वीकारणारा सम्राट चण्डाशोक, अधोगतीस पोहोचलेल्या अखेरच्या मौर्य नृपतीस बाजूस सारून यवनांना पळवणारा सेनापती पुष्यमित्र शुंग व यवनराज दिमित्राचे आक्रमण परतवण्याकरता मगधराजाशी शत्रुता विसरून संधी करणारा चेदिराज खारवेल यांच्या स्मरणाने आमची संघशक्ती जागृत होते.

अगस्त्यः कंबुकौण्डिन्यौ राजेंद्रश्चोलवंशजः ।
अशोकः पुष्यमित्रश्च खारवेलः सुनीतिमान् ॥ २२ ॥

कौटिलीय अर्थशास्त्राचा रचयिता आर्य चाणक्य, हिंदुकुशपर्वतापर्यंत प्रशासन करणारा सम्राट चंद्रगुप्त, अवंतीच्या स्वतंत्रतेसाठी शकांचा पराभव करणारा शककर्ता सम्राट विक्रमादित्य, पैठणला नवी राजधानी वसवणारा शककर्ता शातवाहन राजा शालिवाहन, आर्यावर्तात सुवर्णयुग आणणारा दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त, हूणांच्या वर्चस्वापासून मुक्त असे एकछत्री साम्राज्य स्थापून कन्नौजला त्याची राजधानी करणारा राजा हर्षवर्धन, ब्रह्मदेशावर सत्ता गाजवणारा कलिंगराज शैलेंद्र तसेच अरबस्थानापर्यंत पाठलाग करून अरबांना परास्त करणारा चितौडाधिपती बाप्पा रावळ यांचे स्मरण आम्हाला "परं वैभवं नेतुं एतद् स्वराष्ट्रम्" ह्या आमच्या निर्धाराची आठवण करून देते.

चाणक्यश्चंद्रगुप्तौच विक्रमः शालिवाहनः ।
समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेंद्रो बप्परावळः ॥ २३ ॥

मामापेक्षा देश मोठा म्हणून मुगल सेनेला फितुर झालेल्या मामाचा शिरच्छेद करणारा वीर अहोम सेनापती लाचित बडफुकन, कुशल प्रशासक राजा भास्करवर्मा, महाक्रुर हूण राजा मिहिरकुल याचा पराभव करणारा मंदसौरनरेश यशोधर्मा, विजयनगरचा प्रसिद्ध शास्ता कृष्णदेवराय व आक्रमण हाच संरक्षणाचा राजमार्ग मानून "तुर्क, मुस्लिमादी" आक्रमकांचा त्यांचे घरापर्यंत जाऊन पाठलाग करून त्यांना परास्त करणारा ललितादित्य मुक्तापीड आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देतात.

लाचिद भास्करवर्माच यशोधर्माच हूणजित ।
श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः ॥ २४ ॥

महान संघटक मुसुनुरी नायक (प्रोलय व कप्पय), मेवाड नरेश महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज तसेच काशी विश्वनाथ व हरमिंदर मंदिरावर सुवर्णकलश चढवणारा महाराजा रणजीतसिंह यांचे विक्रम विश्वविख्यात आहेत. त्यांचे स्मरण आमच्या विजिगिषू वृत्तीत भर घालते.

मुसुनुरिनायकौ तौ प्रतापः शिवभूपती: ।
रणजित्सिंह इत्येते वीरा विख्यातविक्रमा: ॥ २५ ॥

सांख्यसूत्रांचे रचयिता कपिल मुनी, वैशेषिक सूत्र प्रणेता महर्षी कणाद, प्रख्यात शल्यविशारद सुश्रुत, कायाचिकित्सेवर "चरकसंहिता" लिहीणारे चरकऋषी, गुरूत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य तसेच बृहत्संहितेचे रचयिता वराहमिहिर आमच्यातील वैज्ञानिक प्रेरणांना दृढमूल करतात.

वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः सुश्रुतस्तथा ।
चरको भास्कराचर्यो वराह्मिहिरः सुधीः ॥ २६ ॥

रसायनशास्त्राच्या व आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भावास राज्य सोपवणारा नागार्जुन, प्राचीन विमानविद्येचे प्रणेते भरद्वाज ऋषी, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आर्यभट्ट, वनस्पतींना जीव असतो असा शोध लावणारे जगदीशचंद्र बोस, प्रकाशावरील "रामनप्रभाव" शोधून काढणारे चंद्रशेखर वेंकटरमण व श्रेष्ठ गणितज्ञ रामानुजम् आमच्या संपन्न वैज्ञानिक परंपरेची आम्हाला आठवण देतात.

नागार्जुनो भरद्वाजः आर्यभट्टो बसुर्बुधः ।
ध्येयो वेंकटरामश्च विज्ञा रामानुजादयः ॥ २७ ॥

स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद, गीतांजलीकार रविंद्रनाथ ठाकूर, ब्राह्मोसमाजसंस्थापक राजा राममोहन राय, स्वामी रामतीर्थ, योगी अरविंद तसेच स्वामी विवेकानंद यांचा सांस्कृतिक वारसा आम्हाला लाभलेला आहे.

रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः ।
रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानंद उद्यशाः ॥ २८ ॥

थोर समाजसुधारक दादाभाई नौरोजी, दीनदुःखितांचे कैवारी गोपबंधू दास, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" असा उद्घोष करणारे लोकमान्य टिळक, अहिंसेचे पूजक महात्मा गांधी, रमण महर्षी, पंडित मदन मोहन मालवीय तसेच सुब्रह्मण्यम् भारती अशा थोर पुरूषांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.

दादाभाई गोपबंधुः तिलको गांधिरादृताः ।
रमणो मालवीयश्च श्रीसुब्रह्मण्यमभारती ॥ २९ ॥

सुभाषचंद्र बोस, भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक प्रणवानंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भिल्ल सेवा मंडळाचे संस्थापक ठक्कर बाप्पा, घटनाकार आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रखर पुरस्कर्ते महात्मा फुले तसेच हिंदू संघटक नारायण गुरू अशांचे स्मरण आम्हाला प्रेरणा देते.

सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः ।
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरूः ॥ ३० ॥

संघनिर्माता डॉ. हेडगेवार व संघविस्तारक गोळवलकर गुरूजी यांचे स्मरण सदैव चैतन्यदायी भासते.

संघशक्तिप्रणेतारौ केशवोमाधवस्तथा ।
स्मरणीया सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥ ३१ ॥

या भारतवर्षात असे अनेक ईश्वरी आविष्कारास जवळ असणारे महाभाग होऊन गेले ज्यांची नावे वर उल्लेखित नाहीत. असेही अनेक  अज्ञात वीर होऊन गेले ज्यांनी समरांगणावर शत्रूचा विध्वंस केला. त्याचप्रमाणे अनेक समाजोद्धारक व उपयुक्त विज्ञानाविष्कारांत निष्णात असे दिग्गज होऊन गेलेत. पण त्याची नावे ज्ञात नाहीत. अशा सर्व महात्म्यांना आमचे वंदन असो. एकात्मतास्तोत्राची अखेर त्यांच्या स्मरणाविना होऊच शकणार नाही.

अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरणसंसक्तःरुदयाः । अविज्ञाता वीरा अधिसमरमुध्वस्तरिपवः ॥
समाजोधर्तारः सुहितकरविज्ञाननिपुणः । नमस्तेभ्यो भूयाद् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम् ॥ ३२ ॥

हे एकात्मतास्तोत्र जो श्रद्धेने म्हणेल तो राष्ट्रभक्त अखंड भारताचेच स्मरण करेल. यात संशय नाही.

इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत् ।
स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखण्डं भारतं स्मरेत् ॥ ३३ ॥

॥ भारत माता की जय ॥

थोर महात्मे होऊन गेले चरीत्र त्यांचे पाहा जरा ।
आपण त्यांचेसमान व्हावे हाच सापडे बोध खरा ॥