लहान असता, धडपडल्यावर, फुंकर मारी आई,
आलामंतर, कोलामंतर, उंदीर पळून जाई.
वय वाढता, समज वाढता, ‘बाऊ’ मोठा होई,
वारा घालून, लाथ मारून, उंदीर पळत नाही.
नसलेले जे मनासारखे, मनास बिलगून राही,
त्याची होवून उदासीनता, आनंदाला खाई.
आलिया जे भोगासी, ते स्वीकारायचे नाही,
देवळातली रांग मोठी, देते का ह्याची ग्वाही?
राहूकेतू, शनी मंगळाला, ‘मी’घाबरून जाई,
देवदैव नि प्रयत्नाहून, ज्योतिष मोठा होई!
व्यंग-विफलता, जरी असती, नियतीच्या ठाई,
आशेचा एकच नंदादीप, जगण्याला बळ देई.
हास्य ठेवूनी वदनावर, हा प्रवास सुखकर होई,
मात्र पाहिजे, अढळ श्रद्धा, त्या अरुपाच्या पायी.
- अनुबंध