मी सोडले

शीड माझे सागराने मोडले,

वादळाशी झुंजणे मी सोडले.

भेटले काळीज कोठे काळजा?

शब्द शब्दांशी ईमानी बोलले.

आरश्यांनी काय बोलावे खरे?

येथ बुरखे चेहऱ्यांनी ओढले.

कालचे होते खरे, की आजचे?

प्रश्न प्रश्नांच्या हवाली सोडले.

वाहू दे, झालेत एकाकी किती,

आसवांना पापण्यांनी तोडले.

मी किती अस्वस्थ झालो वाचुनी,

शब्द जे जे तू लिहुनी खोडले.

आठवावे लागते तिज नांवही

काळजावर ह्या जिला मी गोंदले.

एवढ्यातच म्यान का करता कट्यारी?

प्राण माझे मी न अजुनी सोडले.

तु नको होऊस कष्टी ईश्वरा,

नांव घेणे मी "तिचेही" सोडले.