धकव रं शामराव - नागपुरी फ़टका

धकव रं शामराव - नागपुरी फ़टका 
धकव रं शामराव झोल नको खावू
नशीबाची गाथा नको कोणापाशी गावू....!
रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा
गारपिटानं कहर केला निसर्गानं कावा
कंबरछाती गहू होता पुरा झोपून गेला
उंबईचा फ़ुलोरा खड्डून झाडून नेला
दोघाचबी गर्‍हाणं सारखच हाय भाऊ ...!
मार्केटात गेलो तर उलटे झाले गिर्‍हे
खरीददार म्हणे ह्या गहू होय का जिरे?
आजकाल म्हणे याले कोंबडी खात नाही
घेवून जा वापस नायतर धडगत नाही
नशीब धुवासाठी मी कोणत्या गंगेत न्हावू?....!
पदवीची पुंगी घेवून पोरगं वणवण फ़िरते
डोनेशनबिगर कुठं नोकरी तरी मिळते?
चपराशाचा भाव सध्या सात लाख सांगते
मास्तर व्हाचं असण तर बारा लाख मांगते
नोकरीले मार गोली म्हणलं खेतीवाडीच पाहू....!
गंगाधर मुटे
......................................................
ढोबळमानाने शब्दार्थ.
झोल खाणे = कच खाणे.माघार घेणे.
उंबई = ओंबी   गिर्‍हे = ग्रह
......................................................