तुझ्या माझ्यातले गाव

न सांगता गुपित;

तुझे मला कळले होते;

आता बोलायचं ठरलं तर;

शब्द कोडगेच ठरले.

तुझी विणताना स्वप्ने;

आशा तुटतच गेल्या;

धागे जोडायचे ठरले;

पण गाठी अवघडतच गेल्या.

तू असाच होतास का?

मी प्रश्न विचारीत राहते;

तुझ्या माझ्यातले गाव;

तेव्हा सारखे बिनसत जाते.

जरा ठेवशील का इथे;

तुझ्या जगण्याचा क्षण;

तुझ्या आठवणींचे तेव्हा;

माझ्या मनावरी व्रण.

मग हळूहळू मीही;

जाईन बनत पाषाण;

तूच देव माझा होता;

जरा फुंक की रे प्राण.