भक्तिविभोर....!!

चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला
आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना
पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला
दूधादह्यास आता कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला
टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला
प्रेमात वारसांच्या स्वहिता भुलून गेला
नात्यास भार होता स्वजनात चोर झाला
यावे तसेच जावे ना 'अभय'दान कोणा
मृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला
गंगाधर मुटे