बळीराजाचे ध्यान आणि सजणीचे रूप..!!

बळीराजाचे ध्यान आणि सजणीचे रूप..!!
बळीराजाचे ध्यान ....!!
(पंढरीचा पांडुरंग आणि संतश्रेष्ट
तुकारामांच्या पायी नतमस्तक होवुन)
सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥
कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥
तुळशीहार जणु घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥
कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥
नैवद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥
आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥
राजा शेतकरी बळीराज यावे
संघटीत व्हावे अभयाने..॥७॥
गंगाधर मुटे.
................................................................
सजणीचे रूप ...!!
(पंढरीचा पांडुरंग आणि संतश्रेष्ट
तुकारामांच्या पायी नतमस्तक होवुन)
रूपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥
गंगाधर मुटे.
-----------------------------------------------------