धुक्यासारखी गं, मला भेटली तू,
तुला वेढिता मीच वेढून गेलो ...
तुझ्या विभ्रमांचे किती लाख भोवरे,
तुला शोधिता मीच हरवून गेलो...
अशी मोगरीच्या कळीसारखी तू,
तुला चुंबिता मीच गंधून गेलो ...
जणू मेघमाला मनाच्या नभी तू,
तुला छेडिता मीच बरसून गेलो...
दवांसारखी थरथरे तूच हृ्दयी,
तुला वेचिता मीच सांडून गेलो ...
मला जीवनाचा कधी अर्थ कळला?
तुला पाहता जीव उधळून गेलो ...