गुढी पाडवा

आपण महाराष्ट्रामध्ये वर्षारंभदिन चैत्र शुद्ध प्रतिपदा मानतो. आपल्याबरोबर इतरही काही समाजांमध्ये वर्षारंभ ह्याच दिवशी होतो. सिंधी लोकांचा चेटी चाँद (चैत्री चंद्र), दक्षिण भारतात काही ठिकाणी उगाडी(युगादि) या नावांनी हा दिवस ओळखला जातो.

'प्रतिपदा' या शब्दावरून 'पाडवा' हा शब्द आला आहे हे उघडच आहे. पण 'गुढी' या शब्दाची व्युत्पत्ती काय असावी? कृ. पां. कुलकर्णी  यांच्या व्युत्पत्ती कोशात नक्कीच असेल. मनोगतींपैकी कोणाकडे हाताशी असेल तर जरूर कळवावे.(शेजारच्या वाचनालयात आहे, पण तिथे जाऊन शोधण्यापेक्षा मनोगतींकडून संदर्भ झटपट मिळतील!)

मध्यप्रदेशातही हा सण साजरा करतात. वर्षारंभ म्हणून नव्हे, पण एक महत्त्वाचा सुदिन म्हणून अगदी महाराष्ट्रातल्याप्रमाणेच गुढ्या उभारून हा दिवस तिथे साजरा केला जातो. मात्र, जबलपुर वगैरे पट्ट्यात गुढीला 'गुड्डी' म्हणतात. या शब्दावर विचार करताना लक्षात आले की खरेच गुढी ही गुड्डी म्हणजे बाहुलीसारखीच दिसते! सर्वात वर गडू किंवा लोटा हे शिर, त्याच्या निमूळत्या भागात बांधलेली माळ हा कंठहार, इतर आभूषणे, खाली घोळदार साडी किंवा परकर, शिवाय गळ्यात
(काही ठिकाणी लहान मुलांच्या गळ्यात  घालतात तशी) चाक्यांची माळ, सजली की आमची ठकी भावली!

गुढी आणि तोरण ही घर -परिसर शृंगारण्याची साधने होती असणार बहुतेक. एखाद्या विशेष प्रसंगी रस्ते झाडून स्वच्छ करणे, त्यावर पाणी शिंपडून धुळीला अटकाव करणे, पताका रांगोळ्या यांनी आसमंत शोभिवंत करणे,हे सर्व एखाद्या विशेष प्रसंगी केले जात होते असणार. एखादा विजयोत्सव, राजा अथवा तत्सम उच्चपदस्थाचे गावातून निर्गमन-आगमन, देशप्रमुखाकडे होणारा पुत्रजन्म, लग्नकार्य यांसारखा आनंदोत्सव साजरा करताना अशी प्रिमिटिव्ह साधनेच कोणे एके काळी वापरावी लागत होती असणार. पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य जन्मास आले तेव्हा सं. म. समितीच्या आवाहनानुसार लोकांनी गुढ्या तोरणे उभारून आठवडाभर दीपोत्सवही केला होता  तो काळ एक मे  ते सात मे हा होता. मुद्दा हा की गुढी केवळ चैत्र पाडव्यालाच उभारावी असे नाही.किंवा नव्या वर्षाच्या सजावटीसाठी गुढीच पाहिजे असे नाही. आधुनिक साधनेही वापरली तरी चालतील , उदा.पुष्पगुच्छ,विद्युत माळा,वगैरे.नाहीतरी अलीकडे कोणी पंचांगफल वाचत नाही, तैलमर्दन करत नाही(शोभायात्रेतून घामाने निथळत घरी आल्यावर  पुन्हा एकदा स्नान करावेच लागते. ) ह्या दिवशी नवीन वस्तू घरी आणल्यावर हा दिवस आनंदाने  साजरा होतोच. 

असो. आपणा सर्व मनोगतींना नववर्ष सुखाचे,समृद्धीचे आणि आनंदाचे जावो ही प्रार्थना.