अंगणातील लिंब वठला अन गेला कसा मरून
वठलेल्या लिंबाखाली मज अता भाजते ऊन
डोकवू नकोस म्हटले अचरटपणे असा तू
आवर फांद्या थोड्या, तर गेलास की रुसून
आणली विकत मी पाने वाटते मनी हुरहूर
ही गुढी उभारू कैसी, सांग ना, तुझ्यावाचून
वठलेल्या खोडापाशी मी मूक ढाळितो अश्रू
पाहतो वाट कोंबाची डोळ्यात प्राण आणून