हा सोहळा कशासाठी?

सोहळ्यात आम्ही जगतो,
सोहळ्यात आम्ही मरतो,
सोहळ्यात पुन्हा उगवतो,
सोहळे करण्यासाठी.

कुणी आल्याचा सोहळा,
मूल झाल्याचा सोहळा,
कुणी मेल्याचा सोहळा,
गर्दी करण्यासाठी.

येती पौराणिक सोवळे,
काही आधुनिक ओवळे,
अन मधले ढोमकावळे,
फक्त जेवण्यासाठी.

कोण होता तो प्रेषित?
की स्वातंत्र्यसैनिक?
आम्ही होऊनी यांत्रिक,
जमतो नाचण्यासाठी.

असता देवाचे सोहळे,
घालूनी मांडव वेगळे,
फिल्मी गाण्यात सगळे,
म्हणतो हे सर्व देवासाठी.

सोहळ्यात दु:ख विसरतो
सोहळ्यात सुख विसरतो
सोहळ्यात हेही विसरतो
हा सोहळा कशासाठी?

- अनुबंध