याचक

कुणी याचक दारी उभा
कळकट नसलेला
मांडीवर घुंगुर खेळवणाऱ्या
नाथासारखे पाय हलवत
दारी उभा ।
मनात चीड हळव्या भावनांचे समर
मी खिशात हात घातला
हाती आले नाणे ते
समोरच्या हाती ठेवले ।
माझी नजर त्याने वाचली असावी
ते नाणे परत देत तो म्हणाला
मला ते दे जे तुझे आहे!
संभ्रमित मला सोडून
तो डुलत निघून गेला ।
पुन्हा नंतर तो आला
तीच मागणी करत उभा
नाणे हाती ठेवत
मी इतकेच म्हणालो
राम देणारा तोच घेणारा ।
त्याने ते नाणे
पुन्हा माझ्या हाती ठेवले
तृप्तीने
डोळे मिचकावत हंसला अन्
झणी गेला तो
पुन्हा दिसलाच नाही !!