मायावी

मायावी

===============

गळून गेली
जराठ जाळी
उरली केवल
काडी काटकी
आता आता
इथेच होती
सळसळ वेडी
खुळ्या पिंपळाची

जरा लपेटून
घेता ऒढणी
झुकले डोळे
मिटली पापणी
चाहूल जराशी
लागे शिशिराची
नि हूल देउनी
निसटे मायावी

निष्पर्ण अशी
एक घडी
नजरेत उभी
पूर्ण थिजलेली
युगा युगांची
जणू विराणी
तल्लीन, तद्रूप
निर्मलं, निर्मोही

आता आता
इथेच होती
काडी काटकी
झडल्या पिंपळाची
जरा सोडता
घडी हातांची
माया हसली
नजरेत दडलेली

कोवळी कोवळी
नवथर नव्हाळी
सचेत लालस
सळसळ वेडी
रसरसली सरसरली
पालवली चैत्रावली
भुत्या पिंपळाच्या अंगोपांगी
खूण हिरवी वसंती

===============
स्वाती फडणीस..... २३०३१०