तेव्हा नव्हते आषाढघन
नव्हती चंद्र चांदण्याची बरसात
नव्हते नव्हाळीचे कसलेच बहाणे
तरी तप्त मनी उजळली फुलवात
निर्झराचा अवखळ नव्हाता
नव्हती शय्या फुलांची
नाद नसता, गंध नसता
लागली चाहूल अदृष्टाची
सुरांचे बंधन नव्हते
नव्हती शब्दांची कारागिरी
तरी मुक्त पक्ष्याचे गाणे एक
ऐकले मी माझिया अंतरी
प्रथमेची मुकी वेदना
बोलके क्षण भोगत होती
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव
मनभूमीवर बरसत होती
ऐक सखे त्या राजसवेळी
मर्मबंध माझे भ्रमले
रविकर अन् फुलराणीची
कथा जुनी ती स्मरून हसले