जगलो कसेबसे हे, आयुष्य दो क्षणांचे
भिक्षेत लाभलेले, आयुष्य दो क्षणांचे ...
हा खेळ सप्तरंगी, उःशाप श्रावणाला
ओलावल्या उन्हाचे, आयुष्य दो क्षणांचे ...
घेऊन टाक सारे, देणे तुझे युगांचे
माझे मला पुरेसे, आयुष्य दो क्षणांचे ...
बेभान लाट होती, हा दोष ना कुणाचा
वाळुतल्या घराचे, आयुष्य दो क्षणांचे ...
हासू जरी सुगंधी, उधळेल बाग सारी
बहरातल्या फुलांचे, आयुष्य दो क्षणांचे ...
उधळून टाकताना तू खेळ जाणले ना
पेल्यात वादळाचे, आयुष्य दो क्षणांचे ...
विकलांग आठवांनी अश्रू अतां कशाला
अश्रुंत आठवांचे, आयुष्य दो क्षणांचे ...
शापांस जीवनाच्या जाईन मी ठगुनी
असते कुणाकुणाचे, आयुष्य दो क्षणांचे ...