(फांदी)

आमचा प्रेरणास्रोत : प्रदीप कुलकर्णींची सुंदर गझल "फांदी". विडंबन प्रकाशित करण्यासाठीची  पाच प्रतिसादांची पूर्वअट प्रदीपरावांच्या प्रतिभेने केवळ काही तासात लीलया पूर्ण केल्यामुळे आम्ही आमची ही खोडी एवढ्या तातडीने आपल्या सर्वांच्या समोर (की 'समोरी'   ) सादर करू शकत आहोत.

मस्त शब्दांची सुरू आहे लगोरी !

त्यावरी हे काव्य खोड्याचे अघोरी !

 
केवढी पोरे तिथे ही चाललेली...

देखण्या आहेत की नाहीत पोरी ?   

 
वाचता अक्षर मला एकेक आले...

तू मला लिहिलीस पत्रे पाठकोरी !

 
मी तुझी केलीच आहे ना टवाळी ?

तू तरी केलीस का ही शब्दखोरी ?

 
वाचली कविता तुझी एकेक जेव्हा...

जागला माझ्यातला लेखक टपोरी ! 

 
रांग कार्ट्यांची तशी ही ओळखीची...

पोरगे माझे-तुझे, अपुल्याच पोरी !

 
बोच शब्दांची तुला ही ओळखीची...

पाहता गांभीर्य, मज सुचते छचोरी !

 
काजवे का एवढे चमकून गेले ?

बाधली ना शेवटी तुज भांडखोरी ? 

 
मी तुझ्या खाण्यास कंटाळून गेलो...

हा वडा कितवा, तुझी कितवी कचोरी ?

 
पँटच्या बाहेर आली एक मांडी...

ही खिसेकापू कला आहे अघोरी