२६/११

एक होता माणूस, तो एकदा हॉटेलात गेला

पदार्थांवर प्रेम करून पोटाला आनंद देऊ लागला

अशीच माणसे जमा झाली, गप्पांचीही रंगत वाढली

दिव्यांच्या सजावटीच्या संगतीने मेंदूंचीही मैफल रंगली

इतक्यात एक आवाज आला,

"हॉटेलात आलेत मोठे राक्षस! "

राक्षसांच्या अस्तित्वाची झाली नुसती जाणीव

थरकाप उडून भेदरले सारे जीव!

आता वेळ होती पायांची

डोळे आले पायात आणि वाट फुटेल तेथे पळाले,

गोळीबाराच्या आवाजाने तर

कानाचे कामच संपवून टाकले

माणसे सगळी भरली गेली खोल्यांच्या चौरसात

निकामी डोळे, कान, पाय, पोट, गुडघे नि हात!

दरवाजाचा आधार एवढा कधी वाटला नव्हता

यापूर्वी एक-एक अवयव असा कधीही गोठला नव्हता!

अचानक आला काळा धूर

एकेकाचे गले आवळू लागला

जीवघेण्या खेळत एक एक

भिडू बाद होऊ लागला!

बाहेर आवाज, आत वास

ओळखी- अनोळखीचा हवाहवासा तरीही नकोनकोसा सहवास!

 राक्षस म्हटल्यावर देवाचा डिमांड वाढला

भक्तीच्या चढाओढीत तोही मिळेनासा झाला!  

एक एक माणूस क्षणाक्षणाला देह बनू लागला

जीवन-मृत्यूच्या सीमारेषेवर देव असं का फटकून वागला?

वेळ गेली, काळही गेला

वेताळाच्या तांडवाचा अंत झाला

हॉटेलात उरले फक्त वास

जीवनाच्या अस्तित्वाचे फसवे भास!

पुन्हा एकदा राक्षस यशस्वी झाला

माणसाच्या भीतीची पट वाढवून गेला!

एक खेळ संपला, दुसरा खेळ सुरू झाला

मृत्यूने केला भोज्जा आता जीवनाचा डाव आला!

हा तर विचित्रच खेळ!

कफनांतील प्रेतांना गुदगुल्या करण्याचा खेळ,

माणसे हा खेळ आनंदाने खेळू लागली

तरीही माणसेच ती... राक्षस नव्हेत!

 राक्षस तर केव्हाच निघून गेले

ते येतात फक्त 'हात' करण्यापुरते!

बाकी देव, राक्षस आणि माणूस

यांच्यातला हा खेळ असाच चालू राहतो

माणूस बिचारा नशिबाचे पत्ते टाकतच राहतो!