( दिसू लागले स्पष्ट जेवढे )

आमची प्रेरणा चित्त ह्यांची गझल 'दिसू लागले स्पष्ट जेवढे'

लोकांसाठी नेते असती द्दृश्य अता हे धूसर झाले
मिळता सत्ता सारे नेते सुख गिळणारे अजगर झाले

भांडण करता करता हुकमी एक-दोन अश्रू ओघळले
सगळे मुद्दे हतबल झाले, सगळे प्रश्न निरुत्तर झाले

टुकार, भंकस मालिकांमध्ये एक मालिका आली वसकन
राखी, राहुल दोघांचेही, अजुनी एक स्वयंवर झाले

विवाह झाल्यावर तो शिकला शेपुट घालुन नुसते बसणे
आधी तर तो पुरूष होता त्याचे मांजर नंतर झाले

हेमा, सीमा, टीना, मीना, डिंपल, डॉली, रिया वगैरे
खूप पाहिली वाट तुझी मी, खूप खूप विषयांतर झाले

सरळ मार्ग मी धरला म्हणुनी वाट लाविली अधिकार्‍यांनी
वाट वाकडी केल्यावरती संमत माझे टेंडर झाले

घरी अचानक कितीक साड्या, पर्स, दागिने, चपला आल्या
माझ्या कमी पगाराचेही कसे कसे भाषांतर झाले

जुन्या गावच्या गुत्त्यामधल्या गिर्‍हाईकांना म्हणेल आंटी
"नवीन जागी सुद्धा त्याचे खुल्या गटारातच घर झाले"

*तुला पाहिले पहिल्यांदा अन पुन्हा पुन्हा मी बघत राहिलो
बघता बघता डोळ्यांचेही... दोन स्क्रीनचे थेटर झाले

* माझा आवडता सिनेमा ’शोले’ ला समर्पित