ये वरुणा ये वरुणा
करिते धरणी धांवा
आता ये वरुणा ॥धृ।
जाता वसंत वनिं दैना
तापवी वैशाखी वणवा
करुणा नाही त्या तपना
आता ये वरुणा ॥१॥
सलिल आटले बघ ना
करिते लाहिलाही तृष्णा
मरगळ आली पवना
आता ये वरुणा ॥२॥
निजला कां इंदरराणा
कां रमला नंदनवना
आम्ही साहू किती यातना
आता ये वरुणा ॥३॥
घेई श्यामल घनसेना
करो वीज घोर गर्जना
धो धो बरसूं दे जीवना
आता ये वरुणा ॥४॥