आषाढाचा होता हो मास
कृष्णमेघांचा नभी आभास
मयूर नाचे पाहून मेघास
निर्माण होई मनी उल्हास
मध्येच येई मंद समीरण
धक्का देई मेघास विलक्षण
चुकविण्या तो धक्का क्षण
व्यापून टाके मेघ नभांगण
पळता पळता होई गडबड
आदळती एकमेका धडाधड
टक्कर होताच होई पडझड
निर्माण होई चपला कडाडकड
परीणाम होई त्या जलदावर
बरसू लागती बघा भराभर
पर्जन्यधारा पडती वसुंधरेवर
हर्षती पाहा कसे वेली तरुवर
असती गरजवंत जे खरोखर
त्याना देती मेघ जल ते गार
मदतीसाठी असे सदा तत्पर
कृष्णमेघांचे तत्त्व हे मनोहर