हे विद्रोहाचे पाणी
हृदयात शिरू दे माझ्या
बेभान स्वरांचे गाणे
गात्रात घुमू दे माझ्या.. १
प्राक्तनास चुकवून आला
हा डाव मनीचा माझ्या
हातात गुंफले हात तुझे
पावलात पाऊल माझ्या.. २
या नक्षत्रांना देऊ
चांदणे तुझ्या डोळ्यांचे
नभास साहस माझे
अवधूत पाहुणा माझा.. ३
युद्धात जरी मी हरलो
परी विजयी होऊनी उरलो
चांदणे दिवाणे माझे
सूर्यात निघे उमटाया ..४
उमजलो तुला जरी नाही
मी कृष्ण होऊनी विरलो
हृदयात तुझ्या जी फितुरी
बघ सखा तिचा मी झालो.. ५
गर्भात धुमारा तुझीया
मी आनंदाचा नेला
आकाश प्राशुनी घ्याया
तू घडव पुन्हा मातीला.. ६