नदीकिनारी

खळाळती नदी, लागूनच डोंगर

त्यावर हिरव्याजर्द गवताचा बिछाना मोफत

त्या बिछान्यावर निवांत पहुडलेले आपण

कित्ती रोमँटिक, नाही?

नाही.

आणि हे आपणा दोघांनाही माहीत होते.

"लाईफ इज अ वन वे स्ट्रीट, नो रिग्रेटस"

हे माझे (तोवरचे) टाळीचे वाक्य.

त्या "वन वे स्ट्रीट"वर चुकीच्या दिशेने येऊन

तू दोन्ही बाजूंना "नो एंट्री" करून टाकलीस

आणि "नो रिग्रेटस" हे माझेच शब्द

मला वर्षानुवर्षे खावे लागले.

तुझी चुकी होती असे नव्हे,

मी बरोबर नव्हतो हेच खरे.

नदी वाहत राहिली, पाणी बदलत राहिले.

काळाची पाने कण्हत उलटत राहिली.

आपले नव्हे ते आपले करण्याची

माझी धडपडही तीच राहिली.

मांडवीची इंद्रायणी झाली,

झेवियरचा तुकाराम झाला.

पण

मी बरोबर नव्हतो हेच खरे.