अनुस्वार!

.................................................
अनुस्वार!
.................................................

नेहमी देऊ बघे मज पौर्णिमेची रात काही...
वेंधळे मन शोध घेई मात्र अंधारात काही...

एकदा घेऊन मीही पाहिला होता कुणाचा...
- वाटला आधार नाही मात्र आधारात काही!

यापुढे थोडी तरी लाभेल यालाही प्रतिष्ठा...
साव हिंडू लागले या चोरबाजारात काही!

देह स्पर्शावाचुनीही नादतो ठावे, परंतु...
मौज नाही छेडल्यावाचून झंकारात काही!

शेवटी एकाच नाण्याच्या निघाल्या दोन बाजू...
दुःख संन्यासात काही, दुःख संसारात काही!!

सज्ज हो तू, आत कुठल्याही क्षणी येतील आता -
सांजवेळी दाटलेल्या सावल्या दारात काही...!

ल्यायली आहेत काही अक्षरे अद्याप त्याला...
अर्थ नाही राहिलेला ज्या अनुस्वारात काही!!

- प्रदीप कुलकर्णी

....................................................
रचनाकाल : १८ जून २०१०
....................................................