माझिया प्रेमात राणी,गात होतीस तू
भारलेली ही सुगंधी, रात होतीस तू
वाट वेडी, दाट झाडी, साथ होतीस तू
स्पर्श होतो चोरटा, लाडात होतीस तू
पेटती विझले निखारे, आसवांनी जणू
ह्या मनाच्या सागरी खोलात होतीस तू
वाटते की नित्य, नेमाने रुसावेस तू
जीवघेण्या आर्जवी, नादात होतीस तू
बाभळीचे रान होते, पावलो पावली
वेदना ही लाघवी, पायात होतीस तू
ये! नको रागावु आता, श्वास माझाच तू
भान गेल्या पापण्यांना, ज्ञात होतीस तू