निमित्त आहे लोकसत्ता या वर्तमानपत्रात दि. १३ जून रोजी प्रसिद्ध झालेला एक लेख. लेख लिहिणाऱ्या विदुषींबद्दल अत्यंत आदर आहे. त्यांचा व्यासंग आणि विविध विषयांचे ज्ञान(केवळ माहिती नव्हे) दांडगे आहे. ज्यांच्यापुढे नम्र व्हावे अशाच त्या तपोवृद्ध आहेत. आपला एक सांस्कृतिक वारसा असलेल्या एका स्थळाचे सध्या थोडेसे बदललेले नाव पुन्हा मूळ संस्कृत रूपात अधिकृत रीत्या मान्य व्हावे असा त्यांचा आग्रह आहे. काही वर्षांपूर्वी सर्व स्थळनावांचे शुद्धीकरण करून शुद्ध संस्कृत मूळ रूपात ती लिहिण्याची एक लाट आली होती. हा लेख त्या स्वरूपाचा नाही. त्यामागे जी कळकळ आहे ती उघड जाणवते.
अशा तऱ्हेच्या सर्व नावांबद्दल त्यांचा हा आग्रह नसणार हे नक्की. तरीसुद्धा, एक तत्त्व म्हणून हे कितपत योग्य आहे? कित्येक स्थळनावे संस्कृत मधे लांबलचक आणि उच्चारदुष्कर वाटतात. उदा. श्रीस्थानक. त्याचे ठाणे हे रूप सुटसुटीत आहे. किंवा उदकमंडलम चे ऊटी. मुळात लोकव्यवहाराला सोयीचे व्हावे म्हणूनच अशी रूपांतरे झाली. ते चक्र पुन्हा उलट फिरविण्यात काय फायदा?
परकीय राज्यकर्त्यांनी मुद्दाम बदललेली नावे मूळ रूपात आणण्यात देशाभिमान असेलही किंवा आहेच. इथे इंग्रजांचा अपवाद करावा लागेल कारण त्यांनी शक्यतो तंतोतंत प्रचलित उच्चारण व्हावे अशाप्रकारेच एतद्देशीय नावांचे लेखन इंग्लिश मधून केले. पण आपण एतद्देशीयांनी मात्र ते शब्द आपल्या परीने देशीकरण करून उच्चारले आणि लिहिले. उदा. शीव-सायन. इथे शींव मधला मूळचा अनुस्वार इंग्लिश मध्ये यावा म्हणून त्यांनी एस् आय् ओ एन् असा आटापिटा केला आणि आपण मात्र त्याचा सायन असा उच्चार केला! बसीन चे ही तसेच. मूळ वंसई किंवा वसंई किंवा वसईं(जुने वसईकर अजूनही अनुस्वारयुक्तच उच्चार करतात.) चे बी ए एस् एस् ई आय् एन् हे लेखन पोर्तुगीजांनी केले असेल ते ई आय् ह्या संयुक्त वर्णांचा उच्चार अ ई किंवा आई होतो हे लक्षात घेऊनच. आपण मात्र त्याचे बसीन केले.
तर मुद्दा असा आहे की कालौघात बदललेली, सोपी झालेली नावे पुन्हा अवघड आणि दीर्घ करून टाकावी का? म्हणजे मालगुंड चे माल्यकूट, पुणे चे पुण्यपत्तन, पटणा चे पाटलिपुत्र, दिल्लीचे देहली, कनौज चे कान्यकुब्ज, पनवेल चे पर्णवल्ली, सोपारा चे शूर्पारक, भरूच चे भृगुकच्छ वगैरे. खरे तर अपभ्रंश किंवा प्राकृतीकरण होण्याची ही प्रक्रिया हा विद्यमान भारतीय भाषांच्या विकासाचा एक टप्पा आहे आणि ही प्रक्रिया सध्या आणि पुढे अशी सतत चालणारी आहे. सध्या आहेत ती रूपेही कालौघात बदलणार आहेतच. सध्याच आपण पळस्पे, पार्ले, विक्रोळी, अंजूर(अणजूर) असे लिहू लागलो आहोत.
आपले काय मत?